Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सिंधू सूक्त म्हणजे - सावरकरांची अखंड हिंदुस्तान मागची भूमिका

सिंधू सूक्त म्हणजे - सावरकरांची अखंड हिंदुस्तान मागची भूमिका

ब्रिटिशांना पराभूत करून आज आपल्या या स्वतंत्र हिंदुस्थानचे जे महाराज्य आपण स्थापले आहे त्याला मी जे महाराज्य म्हणून उल्लेखितो ते केवळ स्वदेशा अभिमानाच्या आवेगानेच म्हणतो असे नाही.

इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, पोर्तुगाल, इटली, स्विझर्लंड अर्ध्या अधिक युरोपातील आजची सारी राष्ट्रे एकत्र केली तरी त्या भूक्षेत्राहून अधिक विस्तृत असलेला प्रदेश या आपल्या स्वतंत्र महाराज्याच्या चतु:सीमेत सामावला आहे. आणि तो आज बहुतांशी एकजीव, एकराष्ट्र, एकछत्र झाला आहे. गोदावरी ते कृष्णा या दोन नद्यांमधील काय तो परिमित भूभाग म्लेंच्छांच्या हातून शिवछत्रपतींनी जेव्हा मुक्त केला आणि स्वतंत्र हिंदुराज्य स्थापले तेव्हा समर्थ रामदासां सारख्या नि:संग साधूंनाही आनंदाचे भरते आले ! मग आज तर सेतुरामेश्वरापासून हरिद्वार पर्यंतचा आणि पूर्व समुद्रापासून पश्चिम समुद्राचा हा महादेश ही आमची पितृभूमी, ही आमची पुण्यभूमी एकछत्री झाली आहे.

आमच्या प्राचीन चेल, चोल, पांड्य राज्यांच्या राजधान्या, चंद्रगुप्ताचे पाटलीपुत्र, विक्रमाची उज्जैन, शालिवाहनाचे प्रतिष्ठान, यादवांची देवगिरी हरिहर बुक्कांचे विजयनगर इत्यादी आमची प्राचीन राज्य केंद्रे ही सारी एककेंद्रित करून, एकराष्ट्र करून आम्ही आमच्या पांडवांच्या प्राचीन इंद्रप्रस्थातच आज आमचे हिंदुप्रस्थ पुन्हा स्थापले आहे. त्या ज्या महाराज्यावर आमचा सुदर्शन चक्रांकित ध्वज उभारलेला आहे.

आम्हाला नेहमीच ज्याचे नामस्मरण धार्मिक कर्तव्य म्हणून करावे लागते ती सारी पुण्य क्षेत्रे अयोध्या, मथुरा, पुरी, माया, कांची, काशी, अवंतिका, द्वारावती ते जगन्नाथपुरी, मथुरेच्या मीनाक्षी पासून कामरूपी कामाक्षी पर्यंतची सर्व पुण्यक्षेत्रे आज स्वतंत्र मुक्त आणि शुद्ध झाली आहेत. या आमच्या पुण्यक्षेत्रांप्रमाणेच आम्हाला आमच्या राष्ट्र ऐक्याचे स्मरण करून देणारा आणि आमच्या पुण्यतीर्थांना आवाहन करणारा जो मंत्र प्रत्येकाला स्नानाच्या वेळी म्हणावा लागतो त्या

गंगेच यमुनेचैव गोदावरी सरस्वती । नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन् संनिधिं करू ॥ या मंत्रातील ती गंगा, ती यमुना, ती गोदावरी, ती सरस्वती, ती नर्मदा, ती कावेरी ही आमची पुण्यतिर्थो आमच्या राष्ट्रीय पुण्य तीर्थेही या भारतीय महराज्यात आज विमुक्त आणि विशुद्ध होऊन सामावल्या आहेत.

पण या पुण्य सरितात सिंधू का दिसत नाही? सिंधू कुठे आहे?

हाय हाय ह्या पुण्य सरितातील पुण्यतम सरिता जी सिंधू ती मात्र अद्याप या महाराज्यात सामावलेली नाही. सिंधू आम्हास अजूनही अंतरलेली आहे. काय म्हणता? आता सिंधूस विसर ! तिचे नाव त्या मंत्रातून गाळून टाका आणि तो तुमचा स्नानाचा मंत्र आता यापुढे अर्धाच म्हणत जा? नाहीतर आमके सोमे गोमे आमच्यावर रागावतील, आमचा द्वेष करू लागतील ! म्हणून सिंधूचा संबंध सोडून द्या?

छे ! छे !! सारे जग जरी आमचा द्वेष करू लागले किंवा साऱ्या जगाचा जरी आम्हास द्वेष करावा लागला तरी सिंधूचा संबंध आम्ही सोडणार नाही, तोडणार नाही. सिंधूस आम्ही विसरू? सिंधू वाचून हिंदू ! अर्थावाचून शब्द ! प्राणावाचून कुडी ! अशक्य, अशक्य ! जोवर एक तरी हिंदू जिवंत आहे तोवर तो सिंधूस विसरणे शक्य नाही !

जिच्या काठावर आमच्या प्राचीनतम वेदर्षींनी ऋचांची पहिली सामगाने गायिली, जिच्या पुण्यसलीलालाही आपल्या संध्यावंदनातील अर्घ्ये दिली आणि तिला अत्यादराने वेदातील देवतांचे स्थान देऊन तिच्यावरील सुंदरातील सुंदर सूक्ते रचली त्यात तुला, हे अंबितमे, नदीतमे, देवीतमे सिंधू आम्ही कधीही विसरणार नाही. तुझ्या परिसरात आमच्या प्राचीनतम राजर्षींनी नि ब्रह्मर्षींनी केलेल्या यज्ञात प्रदीप्त हुताशनात जेव्हा हवी समर्पित केले तेव्हा अंतराळात उंच उंच दरवळत गेलेल्या त्यांच्या सुगंधाने ललायित होऊन इंद्र, मरुत, वरुण इत्यादी देव त्यांचे त्यांचे हवीर्भाग स्वीकारण्यास तुझ्या तिरी येत आणि सोमरसासमवेतच तुझे सुमधुर सलील पिऊन प्रसन्न होत, त्या तुला हे सुरसरिते सिंधू आम्ही कधीही विसरणार नाही.

त्यातही या आमच्या महाराष्ट्राला तरी पूर्वीपासूनच तुझी अवीट ओढ लागलेली आहे. पूर्वी एकदा जेव्हा तू आम्हाला अशीच अंतरली होतीस तेव्हाही पारतंत्र्याच्या बंदीवासातून तुला मुक्त करण्यासाठी महाराष्ट्राचे चतुरंग सैन्य उत्तरदिशेवर चढून गेले. कारण दक्षिण दिग्विजय साधला पण उत्तर दिग्विजय उरला असे हळहळत आमचे छत्रपती शिवाजी महाराज स्वर्गस्थ झाले. त्यांची ती अपुरी इच्छा पुरी करण्यासाठी नर्मदा ओलांडून पहिल्या बाजीरावांनी चंबळ गाठली पण नुसते चंबळचे पाणी पिऊन आमच्या विजयिष्णु घोड्यांची तहान भागली नाही ! म्हणून त्या मोगल बादशहाची दाढी जाळून टाकतो असे गर्जत पहिले बाजीराव दिल्लीवर चालून गेले. आमचे विजयिष्णु घोडे यमुनेचे पाणी प्यायले, गंगेचे पाणी प्याले पण त्यांची विजयतृष्णा भागेना. म्हणून ते पुढे घुसले त्यांनी शतद्रु म्हणजे सतलज ओलांडली, वितस्ता म्हणजे झेलम ओलांडली आणि म्लेंच्छांना पादाक्रांत करत त्यांनी जेव्हा अटकेवर भगवाजरिपटका उभारला आणि तुझे तीर गाठून, तुझे ते पवित्र सलील आकंठ प्राशन केले, तेव्हाच काय ती त्यांची विजयतृष्णा क्षणभर भागली ! त्यात तुला कोणीही जरी एक वेळ विसरले तरी हे स्रोत:स्विनि सिंधु, हा आमचा एकटा महाराष्ट्र उठून तुला पुन्हा विमुक्त केल्यावाचून राहणार नाही.

(संदर्भ- स्वातंत्र्यवीर सावरकर अभिनव भारत सांगता, भाषण तिसरे, समग्र सावरकर खंड ८ वा)

संकलन - दुर्गेश जयवंत परुळकर

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi