Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सिंहस्थ कुंभमेळा-२०२७ : विकासकामे वेळेत पूर्ण करा - गिरीश महाजन

सिंहस्थ कुंभमेळा-२०२७ : विकासकामे वेळेत पूर्ण करा - गिरीश महाजन

नाशिक, १ ऑगस्ट (हिं.स.) : सिंहस्थ कुंभमेळा-२०२७ च्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेमार्फत सुरू असलेली सर्व पायाभूत विकासकामे निर्धारित कालमर्यादेत आणि उच्च दर्जाने पूर्ण करण्याचे निर्देश जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापन तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले.

नागरिकांची गैरसोय टाळत सर्व कामांना गती द्यावी, कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड करू नये तसेच सर्व विभागांनी समन्वयातून काम करावे, असे निर्देश मंत्री महाजन यांनी दिले. सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण कार्यालयातील सभागृहात नाशिक महानगरपालिकेच्या सिंहस्थ कुंभमेळा अनुषंगाने सुरू असलेल्या विकासकामांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.या बैठकीस आमदार गोकुळ गिते, महापौर हिमगौरी आडके-आहेर, आमदार देवयानी फरांदे, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, सिंहस्थ कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, महानगरपालिका आयुक्त मनिषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

रस्ते विकासाला प्राधान्य देण्याच्या सूचना

मंत्री महाजन यांनी नाशिक शहरातील रस्ते विकासकामांना सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना केल्या. रस्त्याच्या एका बाजूचे काम पूर्ण होताच तो मार्ग वाहतुकीसाठी खुला करावा आणि उर्वरित कामे समांतरपणे सुरू ठेवावीत, असे त्यांनी सांगितले.पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवणे, साईडपट्ट्या पूर्ववत करणे आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यावर भर देण्याचे निर्देश देण्यात आले.द्वारका सर्कल, काठे गल्ली, त्र्यंबक रोड, सातपूर तसेच इतर पर्यायी मार्गांवरील खड्डे तातडीने बुजवून सुरक्षित वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. वाहतूक पोलीस, महानगरपालिका आणि संबंधित यंत्रणांनी संयुक्तपणे वाहतूक व्यवस्थापन करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई

रस्ते विकासकामांमध्ये निकृष्ट दर्जाचे काम किंवा विलंब कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. कामे वेळेत सुरू न करणाऱ्या किंवा करारातील अटींचे पालन न करणाऱ्या कंत्राटदारांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा मंत्री महाजन यांनी दिला.तसेच ऑप्टिकल फायबर नेटवर्क, सीसीटीव्ही यंत्रणा, डेटा सेंटर, पाणीपुरवठा, एसटीपी, सिव्हरेज, पूल, डीपी रस्ते आणि महाडा प्रकल्प यांसह सर्व प्रकल्पांना गती देण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

१,५०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे सुरक्षा व्यवस्था

महापालिका आयुक्त मनिषा खत्री यांनी सिंहस्थ कुंभमेळा-२०२७ अनुषंगाने सुरू असलेल्या विकासकामांचे सादरीकरण केले. रस्ते, पूल, पाणीपुरवठा, जलनिस्सारण, स्टॉर्म वॉटर ड्रेनेज, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी), ऑप्टिकल फायबर नेटवर्क, सीसीटीव्ही, अग्निसुरक्षा आणि आरोग्य सुविधांच्या प्रगतीची माहिती त्यांनी दिली.शहरात प्रस्तावित ऑप्टिकल फायबर नेटवर्कपैकी सुमारे २६५ किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून उर्वरित काम रस्ते प्रकल्पांशी समन्वय साधून सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर सुमारे १,५०० अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात येणार आहेत. यामुळे वाहतूक नियंत्रण, गर्दी व्यवस्थापन आणि सुरक्षेवर प्रभावी देखरेख ठेवता येणार आहे.

ऑगस्ट अखेरपर्यंत बहुतांश युटिलिटी कामे पूर्ण करण्याचे नियोजन

गंगापूर फाटा, अंबड, राजीव गांधी मार्ग, त्र्यंबक रोड, सातपूर आदी प्रमुख मार्गांवरील स्टॉर्म वॉटर ड्रेनेज, पाणीपुरवठा, जलनिस्सारण आणि भूमिगत सुविधांची कामे नियोजनानुसार सुरू आहेत. ऑगस्ट अखेरपर्यंत बहुतांश युटिलिटी कामे पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे आयुक्त खत्री यांनी सांगितले.संत गाडगे महाराज पूल, त्र्यंबक रोड परिसरातील पूल तसेच इतर पुलांची कामे वेगाने सुरू असून नदीपात्रातील पायाभूत कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित संरचनात्मक कामांना गती देण्यात आली आहे.सर्व प्रकल्पांसाठी निश्चित वेळापत्रक तयार करण्यात आले असून प्रत्येक कामाचे नियमित निरीक्षण करून सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी सर्व विकासकामे पूर्ण करण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध असल्याचे आयुक्त मनिषा खत्री यांनी सांगितले.

---------------------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi