Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सोलापूर - सलगर वस्तीतील ११८ वृक्षतोड प्रकरणी १.२२ कोटींचा दंड; चौघांवर कारवाई

सोलापूर - सलगर वस्तीतील ११८ वृक्षतोड प्रकरणी १.२२ कोटींचा दंड; चौघांवर कारवाई

सोलापूर, 02 जुलै (हिं.स.) : सलगर वस्ती परिसरातील खासगी जागेवरील ११८ वृक्षांची बेकायदा तोड केल्याप्रकरणी सोलापूर महानगरपालिकेने कठोर कारवाई करत जागामालकांसह चौघांवर तब्बल १ कोटी २२ लाख २१ हजार ३०० रुपयांचा दंड ठोठावला आहे.

महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी सुनावणीनंतर हा आदेश दिला असून, संबंधितांना १५ दिवसांच्या आत दंडाची रक्कम जमा करण्याचे निर्देश दिले आहेत.

या प्रकरणी महापालिकेने जागामालक राजेंद्र हजारे आणि शिवानंद पाटील यांना नोटीस बजावली होती. त्यानंतर झालेल्या सुनावणीत आयुक्तांनी राजेंद्र हजारे, आशा हजारे, शिवानंद पाटील आणि अंकित पाटील यांना दोषी ठरवत संयुक्तपणे १.२२ कोटी रुपयांचा दंड आकारला.

आदेशानुसार, निर्धारित मुदतीत दंडाची रक्कम न भरल्यास संबंधित जागेच्या सातबारा उताऱ्यावर दंडाची बोजा नोंद करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे शहरातील विकासक आणि जमीनमालकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, सोलापुरात वृक्षतोडीप्रकरणी इतक्या मोठ्या रकमेचा दंड ठोठावण्याची ही पहिलीच घटना ठरली आहे.

महापालिकेच्या पंचनाम्यानुसार संबंधित जागेवर एकूण ११८ वृक्षांची बेकायदा कत्तल करण्यात आली होती. त्यानुसार प्रत्येक वृक्षामागे एक लाख रुपये या दराने १ कोटी १८ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. याशिवाय वन विभागाने लावलेला ४ लाख २१ हजार ३०० रुपयांचा दंड जोडून एकूण दंडाची रक्कम १ कोटी २२ लाख २१ हजार ३०० रुपये निश्चित करण्यात आली आहे.

महापालिकेच्या या कठोर कारवाईमुळे भविष्यात वृक्षतोड करण्यापूर्वी संबंधित विभागाची पूर्वपरवानगी घेणे अनिवार्य असल्याचा स्पष्ट संदेश विकासक आणि नागरिकांना मिळाल्याचे मानले जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi