Sunday, 03 Jan, 12.29 pm Hindusthan Samachar

मुख्य बातमी
स्वदेशी लसीने आरोग्यपूर्ण आणि कोरोनामुक्त भारताचा मार्ग वेगाने प्रशस्त होणार : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली, 3 जानेवारी (हिं.स)

भारताच्या औषध नियंत्रक महासंचालायाने रविवारी सीरम इंस्टीट्यू ऑफ इंडिया आणि भारत बायोटेक द्वारा निर्मिती कोरोना लसीस अत्यावश्यक आणि आणीबाणीच्या परिस्थित सीमित वापरासाठी मंजुरी दिली.सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेक द्वारा निर्मिती कोरोना लसीबाबत भारताच्या औषध नियंत्रक महासंचालायाने घेतलेल्या निर्णयावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आनंद व्यक्त केला.

ट्वीटर द्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत सुरु असलेल्या अभियानास एक निर्णयक वळण लाभले आहे. भारताच्या औषध नियंत्रक महासंचालायाने सीरम इंस्टीट्यू ऑफ इंडिया आणि भारत बायोटेक द्वारा निर्मिती कोरोना लसीला परवानगी दिल्यामुळे आरोग्यपूर्ण आणि कोरोनामुक्त भारताचा मार्ग वेगाने प्रशस्त होणार आहे. भारताचे तसेच आपल्या मेहनती वैज्ञानिक आणि नवनिर्मितीकारांचे अभिनंदन.

अत्यावश्यक आणि आणीबाणीच्या परिस्थित वापरासाठी मंजूर केलेले ह्या दोन्ही लस स्वदेशी आहेत ही प्रत्तेक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे. आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी भारतीय वैज्ञानिकांची तळमळ यातून दिसून येते ज्याचा मूळ भाव काळजी आणि करुणा आहे. कठीण काळात कार्यरत डॉक्टर, आरोग्य सेवक, कर्मचारी, वैज्ञानिक, पोलीस, स्वच्छता कार्यकर्ते आणि सर्व कोरोना योध्यांचे अतिशय विपरीत परिस्थितीत त्यांनी अनेकांचे प्राण वाचविल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता भाव व्यक्त करतो."

मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात कोरोन लस विकास आणि उत्पादन प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अहमदाबादच्या झायडस बायोटेक पार्क, हैदराबादच्या भारत बायोटेक आणि पुण्याच्या सीरम इंस्टीट्यू ऑफ इंडियाला भेट दिली होती . मास्क आणि वैयक्तिक संरक्षण संच परिधान करून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना लस विषयक कार्यक्रमाची माहिती तसेच प्रगती जाणून घेतली तसेच परिसरातील व्यवस्था आणि यंत्रणांचे अवलोकन केले. यावेळी संबंधित संस्थांचे अधिकारी, वैज्ञानिक आणि मान्यवर उपस्थित होते.

याशिवाय संपूर्ण देशात कोरोनाचा धोका आणि वाढत संसर्ग लक्षात घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्याशी दृक-श्राव्य माध्यमाद्वारे संवाद साधला होता तसेच तसेच कोरोना लसीसंबंधीत व्यापक चर्चा, मंथन केले तसेच राज्यातील कोरोना परिस्थिती आणि आरोग्य व्यवस्थांचा आढावा घेतला होता.

सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील 125 जिल्ह्यांतील 286 लसीकरण केंद्रांवर शनिवारी एक देशव्यापी मोहीम राबवून लस देण्यासंबंधीचे रंगीत तालीमीसारखे सरावसत्र घेण्यात आले. प्रत्येक जिल्ह्याने तीन किंवा अधिक केंद्रांवर रंगीत तालीम घेतली असून यामध्ये एक सार्वजनिक आरोग्य सेवाकेंद्र (जिल्हा रुग्णालय/ वैद्यकीय महाविद्यालय) खासगी आरोग्य केंद्र आणि ग्रामीण किंवा शहरी आरोग्यकेंद्र यांचा समावेश होता. कार्यान्वयन आणि रंगीत तालीम घेण्यासाठी सर्व राज्य आणि जिल्हा अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.

आरोग्य यंत्रणेत कोरोना लस देण्यासाठी आखलेल्या प्रणालीची तपासणी करण्याच्या उद्देशाने ही रंगीत तालीम घेण्यात आली. तसेच गट, जिल्हा आणि राज्य पातळीवर नियोजन,अंमलबजावणी आणि अहवाल तयार करण्याबाबत को-विन अप्लिकेशनची व्यवहार्यता तपासण्याचेही उद्दिष्ट यावेळी ठेवण्यात आले होते. राज्य, जिल्हा, गट आणि रुग्णालय पातळीवरील अधिकाऱ्यांना कोरोना लसीच्या सर्व मुद्द्यांचा परिचय करून देण्यासाठीही आजची तालीम घेण्यात आली.

देशपातळीवर राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी सकाळी 9 वाजल्यापासून विनाव्यत्यय रंगीत तालीम सुरु केली. लाभार्थ्याची माहिती भरणे, लसीकरण केंद्र नेमून देणे आणि सूक्ष्म नियोजन, लस वितरण, केंद्र व्यवस्थापन, अहवाल तयार करण्याची पद्धत अशा निरनिराळ्या कृतींचा सराव आजच्या दिवसात करण्यात आला. यावेळी ख-या लसीकरण दिवसाचे जवळपास हुबेहूब प्रात्यक्षिक करून बघण्यासाठी आज चांगल्या पद्धतीने तालीम करण्यात आली. लसीकरणानंतरचे संभाव्य दुष्परिणाम हाताळण्याची तयारी आणि संबंधित कॉल सेन्टर्सचे कार्यान्वयनही तपासले गेले. या रंगीत तालमीचे पर्यवेक्षण जिल्हाधिकाऱ्यांनी केले. दिवसभरात आलेल्या अडचणी आणि आव्हानांबद्दल चर्चा करण्यासाठी जिल्हा आणि राज्य पातळीवर बैठका होऊन रंगीत तालमीची सांगता झाली. कार्यान्वयन आणि को-विन सॉफ्टवेअरच्या वापरासह रंगीत तालमीचे यशस्वी आयोजन झाल्याबद्दल राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांनी समाधान व्यक्त केले.

को-विन सॉफ्टवेअरची निर्मिती, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने लसीचा रिअल टाईम साठा, साठ्यासाठी लागणारे तापमान आणि कोविड-19 लसीकरणाच्या लाभार्थ्यांचा वैयक्तिक मागोवा घेण्यासाठी केली आहे. हे सॉफ्टवेअर पूर्व-नोंदणीकृत लाभार्थ्यांसाठी स्वयंचलित वाटपाद्वारे सर्व स्तरातील कार्यक्रम व्यवस्थापकांना मदत करेल. लसीकरण वेळापत्रक पूर्ण झाल्यावर त्याचे सत्यापन आणि डिजिटल प्रमाणपत्र तयार केले जाईल. को-विन सॉफ्टवेअरवर आतापर्यंत 75 लाख लाभार्थ्यांची नोंदणी झाली आहे.

देशभरात कोरोना लसीचा शेवटच्या घटकापर्यंत योग्यरित्या पुरवठा करण्यासाठी शीत साखळी सुविधायुक्त तापमान नियंत्रित वातावरण आवश्यक आहे. कोविड लसीकरणासाठी पुरेशा सुया (सिरिंज) आणि इतर साहित्याची निश्चिती केली गेली आहे. सुमारे 1,14,100 जणांना लसीकरणासाठी प्रशिक्षण देण्यात आले आहे. यात कार्यस्थळावर लाभार्थ्यांची ओळख, लसीकरण, शीत साखळी आणि लॉजिस्टीक व्यवस्थापन, जैव-वैद्यकीय कचरा व्यवस्थापन, एईएफआय व्यवस्थापन आणि को-विन सॉफ्टवेअरवर माहिती अपलोड करणे याचा समावेश आहे. संपूर्ण प्रक्रियात्मक नियोजन आणि माहिती-तंत्रज्ञान प्लॅटफॉर्मची चाचणी आंध्र प्रदेश, आसाम, पंजाब आणि गुजरात येथे 28 आणि 29 डिसेंबर 20 रोजी करण्यात आली, या आधारावर माहिती-तंत्रज्ञान प्रणालीत काही सुक्ष्म बदल करण्यात आले आहेत.


हिंदुस्थान समाचार

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi
Top