Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

स्वारातीमधील जीएनएम नर्सिंग कॉलेजचे १०० जागांच्या बीएस्सी नर्सिंग महाविद्यालयात श्रेणीवर्धन

बीड, 08 जुलै (हिं.स.)।

हाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने जारी केलेल्या अधिकृत शासन निर्णयानुसार, अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न असलेल्या जीएनएम पदविका परिचर्या विद्यालयाचे श्रेणीवर्धन करून ते आता १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय परिचर्या पदवी (बीएस्सी नर्सिंग) महाविद्यालय म्हणून सुरू करण्यास मंजुरी दिली आहे.

केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी अंबाजोगाई परिसरातील आणि बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याभिमुख उच्च शिक्षणासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी शासनाकडे सातत्याने आणि आग्रही पाठपुरावा केला होता. त्यांच्या या सातत्यपूर्ण प्रयत्नांना या निर्णयामुळे अखेर मोठे यश आले आहे.

देशात आणि राज्यात झपाट्याने वाढणारी लोकसंख्या आणि आरोग्याच्या गरजा लक्षात घेता प्रशिक्षित नर्सेसची मागणी प्रचंड वाढली आहे, मात्र त्या तुलनेत उपलब्ध पदवीधरांची संख्या अपुरी पडत आहे. हीच निकड ओळखून २१ जून २०२६ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या महत्त्वपूर्ण प्रस्तावाला मान्यता देण्यात आली होती. अंबाजोगाई येथील या महाविद्यालयाच्या श्रेणीवर्धनासाठी 'अपग्रेडेशन ऑफ स्कूल्स ऑफ नर्सिंग टू कॉलेज ऑफ नर्सिंग' या केंद्रीय क्षेत्र योजनेंतर्गत ७ कोटी रुपयांचा १०० टक्के केंद्र पुरस्कृत निधी उपलब्ध करून दिला जाणार असून, उर्वरित आवश्यक खर्च राज्य शासनामार्फत केला जाईल. या महाविद्यालयासाठी नवीन इमारत आधीच अस्तित्वात असल्याने पायाभूत सुविधांचा तातडीने वापर करून शैक्षणिक प्रक्रिया गतिमान करणे सुलभ होणार आहे.

या निर्णयामुळे बीड जिल्हा आणि विशेषतः अंबाजोगाई परिसरातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आता नर्सिंग क्षेत्रातील उच्च पदवीचे शिक्षण स्थानिक पातळीवरच उपलब्ध होणार आहे. वैद्यकीय क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या शेकडो युवक-युवतींना यामुळे रोजगाराच्या दर्जेदार संधी निर्माण होतील आणि ग्रामीण आरोग्य यंत्रणेला मोठे बळ मिळेल. या निर्णयाबद्दल आ. नमिता मुंदडा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, मंत्री पंकजाताई मुंडे, राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांचे आभार मानले आहेत. दरम्यान, आ. नमिता मुंदडा यांनी या अत्यंत गरजेच्या सुविधेसाठी थेट मंत्रालयापर्यंत केलेल्या अविरत प्रयत्नांचे सर्व स्तरांतून जोरदार स्वागत व कौतुक होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi