चेन्नई , 05 मे (हिं.स.)। तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत अभिनेता विजय यांच्या टीव्हीके पक्षाने 100 पेक्षा अधिक जागा जिंकून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. मात्र, बहुमतासाठी आवश्यक 118 या आकड्यापेक्षा ते थोडे मागे राहिले आहेत.
सरकार स्थापन करण्यासाठी टीव्हीकेला आता किमान 10 जागांची गरज आहे. त्यामुळे सरकार स्थापन करण्यासाठी विजय कोणत्या पक्षांचा पाठिंबा घेणार याची चर्चा सुरु आहे. या दरम्यान, राहुल गांधी यांनी टीव्हीकेसोबत आघाडीबाबत मोठा संकेत दिला आहे.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राजकीय अंतर आणि द्रमुकसोबतच्या आघाडीची बंधने बाजूला ठेवत विजय यांच्याशी फोनवर संवाद साधून त्यांच्या शानदार विजयाबद्दल अभिनंदन केले. त्यांनी 'एक्स'वर लिहिले, "मी थिरु विजय यांच्याशी बोललो आणि टीव्हीकेच्या शानदार निकालासाठी त्यांचे अभिनंदन केले. हा जनादेश तरुणांच्या वाढत्या आवाजाचे प्रतीक आहे, ज्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही." राहुल गांधी पुढे म्हणाले, "तमिळनाडू आणि पुदुच्चेरीतील काँग्रेस कार्यकर्त्यांचे त्यांच्या कष्ट आणि पाठिंब्यासाठी मी मनःपूर्वक आभार मानतो. काँग्रेस पक्ष तमिळनाडू आणि पुदुच्चेरीतील जनतेची सेवा आणि संरक्षण करत राहील, याची मी पुन्हा खात्री देतो."
विजय यांनी कोणत्याही इतर पक्षाशी आघाडी न करता राजकारणात प्रवेश केला. त्यांना जवळून ओळखणाऱ्यांचे मत आहे की ते पुढील राजकीय प्रवासही स्वतंत्रपणेच करण्याचा प्रयत्न करतील. मात्र, उत्तम कामगिरी असूनही विजय स्वतःच्या बळावर सरकार स्थापन करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना कोणत्या ना कोणत्या पक्षाचा पाठिंबा घ्यावा लागेल. अशा परिस्थितीत ते काँग्रेसकडून पाठिंबा मागतील का, आणि आघाडीच्या बंधनांमुळे काँग्रेस त्यांना पाठिंबा देईल का, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
निवडणुकीपूर्वी विजय यांच्या पक्ष आणि अन्नाद्रमुक यांच्यात आघाडीबाबत चर्चा झाली होती. मात्र, जागावाटपावर एकमत न झाल्याने दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. आता अन्नाद्रमुक तिसऱ्या क्रमांकावर गेल्याने, आपल्या पारंपरिक प्रतिस्पर्धी द्रमुकला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी ते विजय यांना पाठिंबा देऊ शकतात. विजय यांनाही अन्नाद्रमुकचा पाठिंबा घेण्यात अडचण नसावी, कारण निवडणुकीपूर्वी दोन्ही पक्षांमध्ये आघाडीची शक्यता होती. हे अन्नाद्रमुकसाठीही फायदेशीर ठरू शकते, कारण 2016 मध्ये 'अम्मा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जे. जयललिता यांच्या निधनानंतर पक्ष अस्थिरतेच्या काळातून जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode

