पुणे, 30 जुलै (हिं.स.)।तपासाच्या नावाखाली सातारा येथे पर्यटन केल्याप्रकरणी पुणे शहर पोलिस दलातील एका महिला पोलीस उपनिरीक्षकासह तीन कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे.
विश्रामबाग पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षक, एक पोलीस हवालदार आणि एक पोलीस शिपाई यांच्या दोन वर्षांच्या वार्षिक वेतनवाढी रोखण्याचे आदेश अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांनी दिले आहेत.
विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्याच्या तपासासाठी संबंधित अधिकारी व कर्मचारी फिर्यादीला सोबत घेऊन सातारा येथे गेले होते. मात्र विभागीय चौकशीत त्यांनी केवळ औपचारिक स्वरूपाचा तपास करून उर्वरित वेळ पर्यटन आणि इतर बाबींमध्ये घालवल्याचे निष्पन्न झाले.
चौकशीत असेही समोर आले की, साताऱ्यात पोहोचल्यानंतर स्थानिक पोलिसांशी संपर्क साधून तपासाची माहिती देणे अपेक्षित असताना संबंधित पथकाने प्रथम प्रसिद्ध कणसे ढाब्यावर भोजन केले. त्यानंतर दुपारी साडेतीनच्या सुमारास शाहूपुरी पोलीस ठाण्यात हजेरी लावून घटनास्थळी पंचनामा करण्यात आला. मात्र घटनास्थळावरील व्यक्ती किंवा परिसरातील नागरिकांची कोणतीही चौकशी न करता तपास पूर्ण केल्याचे विभागीय चौकशीत आढळून आले.
या निष्काळजीपणाची गंभीर दखल घेत अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांनी संबंधित तिन्ही कर्मचाऱ्यांच्या दोन वर्षांच्या वार्षिक वेतनवाढी रोखण्याची प्रशासकीय कारवाई केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु

