Dailyhunt
ट्रम्प यांची ब्रिटिश स्कॉच व्हिस्कीवरील टॅरिफ तसेच व्यापार निर्बंध हटवण्याची घोषणा

ट्रम्प यांची ब्रिटिश स्कॉच व्हिस्कीवरील टॅरिफ तसेच व्यापार निर्बंध हटवण्याची घोषणा

वॉशिंग्टन , 01 मे (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी किंग चार्ल्स तृतीय आणि राणी कॅमिला यांच्या अमेरिकेतील राजकीय दौऱ्याच्या सन्मानार्थ मोठी घोषणा केली आहे. ट्रम्प यांनी ब्रिटिश स्कॉच आणि व्हिस्कीवरील टॅरिफ तसेच व्यापार निर्बंध हटवण्याची घोषणा केली.

ट्रुथ सोशल वर शेअर केलेल्या पोस्टमध्ये ट्रम्प यांनी म्हटले, "युनायटेड किंगडमचे राजा आणि राणी, जे नुकतेच व्हाईट हाऊसमधून रवाना झाले आहेत आणि लवकरच त्यांच्या सुंदर देशात परतणार आहेत, त्यांच्या सन्मानार्थ मी व्हिस्कीवरील टॅरिफ आणि निर्बंध हटवत आहे. हे स्कॉटलंड आणि केंटकी राष्ट्रकुलामधील व्हिस्की आणि बॉर्बन व्यापाराशी संबंधित आहे. हे स्कॉटलंड आणि केंटकीमधील अत्यंत महत्त्वाचे उद्योग आहेत." ट्रम्प यांनी पुढे लिहिले, "लोक बराच काळ याची मागणी करत होते. राजा आणि राणी यांनी माझ्याकडून ते काम करून घेतले, जे कोणीही करू शकले नाही-तेही न सांगता. अमेरिकेत त्यांची उपस्थिती माझ्यासाठी मोठा सन्मान आहे." त्यांनी या संदर्भातील कार्यकारी आदेशावर स्वाक्षरीही केली आहे.

किंग चार्ल्स तृतीय आणि राणी कॅमिला यांनी बुधवारी 9/11 स्मारक येथे भेट देऊन दहशतवादी हल्ल्यांतील पीडितांना श्रद्धांजली अर्पण केली. किंग चार्ल्स यांनी न्यूयॉर्कचे महापौर झोहरान ममदानी आणि माजी महापौर मायकेल ब्लूमबर्ग यांचीही भेट घेतली. पूर्वी टॅरिफच्या मुद्द्यावरून आणि आता इराण संघर्षात सहभागी होण्यास ब्रिटनने नकार दिल्यामुळे अमेरिका आणि युनायटेड किंगडम यांच्यातील संबंध तणावपूर्ण झाले होते. इराणविषयक मुद्द्यावर साथ न दिल्याबद्दल ट्रंप यांनी अनेकदा ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांची उघडपणे टीका केली होती.

अमेरिकेसोबतचे संबंध मजबूत करण्यासाठी ब्रिटिश राजघराण्याचा वापर करणे ही ब्रिटनची जुनी रणनीती राहिली आहे. ओव्हल ऑफिसमध्ये झालेल्या भेटीत किंग चार्ल्स तृतीय यांनी अमेरिका आणि ब्रिटनमधील घनिष्ठ संबंधांचा उल्लेख करत, या दोन्ही देशांमधील मैत्री मानव इतिहासातील सर्वात मोठ्या गठबंधांपैकी एक असल्याचे सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi