Dailyhunt
उदगीर येथे तात्काळ अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करावे : आ. संजय बनसोडे

उदगीर येथे तात्काळ अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करावे : आ. संजय बनसोडे

लातूर, 30 एप्रिल (हिं.स.)। लातूर जिल्ह्यातील उदगीर शहर व परिसराचा वेगाने वाढणारा विकास, लोकसंख्या आणि प्रशासकीय कामकाजाचा वाढता व्याप लक्षात घेता उदगीर येथे तात्काळ अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करावे, अशी मागणी माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी शासनाकडे केली आहे.

याबाबत बोलताना आ. संजय बनसोडे यांनी सांगितले की, उदगीर हे लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर असून येथे मोठ्या प्रमाणावर शासकीय कामकाजासाठी नागरिकांना लातूर येथे जावे लागते. त्यामुळे वेळ, पैसा आणि श्रम यांचा मोठा अपव्यय होत आहे. विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांना विविध प्रशासकीय कामांसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.

उदगीर, जळकोट या तालुक्यांतील नागरिकांना महसूल, निवडणूक, आपत्ती व्यवस्थापन, तसेच विविध शासकीय योजनांशी संबंधित कामांसाठी सुलभ सेवा मिळावी यासाठी उदगीर येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन होणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच, या कार्यालयामुळे स्थानिक पातळीवर प्रशासन अधिक सक्षम होईल, निर्णय प्रक्रियेला गती मिळेल आणि नागरिकांच्या समस्या तात्काळ मार्गी लागतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा विस्तार करणे ही काळाची गरज असून शासनाने या मागणीचा गांभीर्याने विचार करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असेही आ.संजय बनसोडे यांनी म्हटले आहे.

उदगीरला तात्काळ अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करावे या जिव्हाळ्याच्या मागणीसाठी आ.बनसोडे यांनी महसुल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांची भेट घेतली.

दरम्यान, या मागणीमुळे उदगीर व परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, लवकरच सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi