Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
उदगीरमध्ये गणेश मंडळांच्या रक्तदान शिबिरात २०२ रक्तदात्यांचा सहभाग

उदगीरमध्ये गणेश मंडळांच्या रक्तदान शिबिरात २०२ रक्तदात्यांचा सहभाग

लातूर, 16 सप्टेंबर (हिं.स.)। लातूर जिल्ह्यात वाढत असलेल्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत लातूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने १ सप्टेंबर २०२६ पासून संपूर्ण लातूर जिल्ह्यात हेल्मेट सक्ती लागू केली आहे.

या हेल्मेट सक्तीचे महत्त्व आता नागरिकांसह विविध सामाजिक व गणेश मंडळांनाही पटू लागले असून, हेल्मेट जनजागृतीला गणेश मंडळे आणि जयंती मंडळांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

याचाच प्रत्यय उदगीर येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरातून आला. कुमठा खुर्द येथील युवा गणेश मित्र मंडळ तसेच बसवेश्वर जयंती मंडळाच्या वतीने आयोजित रक्तदान उपक्रमात तब्बल २०२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. विशेष म्हणजे रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याला मंडळांच्या वतीने हेल्मेट भेट देण्यात आले. रक्तदानातून जीवदान आणि हेल्मेटमधून जीवितरक्षण असा दुहेरी सामाजिक संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

लातूर पोलिसांच्या आवाहनाला गणेश मंडळांचा प्रतिसाद

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लातूर पोलीस विभागाने लातूर जिल्ह्यातील सुमारे १,९०० गणेश मंडळांना समाजाभिमुख उपक्रम राबविण्याचे आवाहन केले होते. गणेशोत्सव केवळ उत्सवापुरता मर्यादित न ठेवता रक्तदान, आरोग्य, रस्ता सुरक्षा, जनजागृती यांसारखे समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचे आवाहन करण्यात आले होते.या आवाहनाला आता जिल्ह्यातील गणेश मंडळांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळू लागला आहे. कुमठा खुर्द येथील युवा गणेश मित्र मंडळाने रक्तदान शिबिर आयोजित करून रक्तदात्यांना हेल्मेट भेट दिले. त्याचप्रमाणे बसवेश्वर जयंती मंडळानेही रक्तदान शिबिराचे आयोजन करून रक्तदात्यांना हेल्मेटचे वाटप केले. या उपक्रमातून दोन्ही मंडळांनी सामाजिक बांधिलकीसोबतच रस्ता सुरक्षेचा प्रभावी संदेश समाजापर्यंत पोहोचविला आहे.

रक्तदानातून जीवदान, हेल्मेटमधून जीवितरक्षण'

रक्तदान केल्यामुळे एखाद्या गरजू रुग्णाचा जीव वाचण्यास मदत होऊ शकते, तर दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर केल्यामुळे अपघाताच्या वेळी डोक्याला होणारी गंभीर दुखापत आणि जीवितहानी टाळण्यास मदत होते. त्यामुळे 'रक्तदानातून जीवदान, हेल्मेटमधून जीवितरक्षण' हा अत्यंत महत्त्वपूर्ण संदेश या उपक्रमातून देण्यात आला.हेल्मेट भेट देण्याच्या माध्यमातून रक्तदात्यांना केवळ त्यांच्या सामाजिक योगदानाबद्दल शुभेच्छा देण्यात आल्या नाहीत, तर त्यांच्या कुटुंबीयांपर्यंतही रस्ता सुरक्षेचा संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

पोलिसांकडून मंडळांचे कौतुक

रक्तदान शिबिराच्या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन भातलवंडे यांनी उपस्थितांना हेल्मेट वापराचे महत्त्व समजावून सांगितले. हेल्मेट हा पोलिसांच्या कारवाईपासून बचाव करण्यासाठी नव्हे, तर स्वतःचा जीव सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक असलेला सुरक्षा कवच आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.यावेळी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. गाडे हे देखील उपस्थित होते. पोलिस अधिकाऱ्यांनी मंडळांच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले.

अपघात रोखण्यासाठी मंडळांचे योगदान महत्त्वाचे

लातूर जिल्ह्यातील हेल्मेट सक्तीचा मुख्य उद्देश नागरिकांना दंड करणे हा नसून अपघातांमध्ये होणारी जीवितहानी कमी करणे आणि नागरिकांचे प्राण वाचविणे हा आहे. हेल्मेट वापराबाबत समाजात जनजागृती वाढविण्यासाठी पोलिस दलाकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.

आता गणेश मंडळे आणि विविध सामाजिक मंडळेही या मोहिमेत सहभागी होत असल्याने हेल्मेट जनजागृतीला व्यापक सामाजिक पाठबळ मिळत आहे. आज केलेली जनजागृती उद्या होणारा अपघात टाळू शकते आणि एखादा जीव वाचवू शकते. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक गणेश मंडळाने आणि सामाजिक मंडळाने अशाच प्रकारे समाजाभिमुख उपक्रम राबवून हेल्मेट सक्तीच्या जनजागृतीमध्ये आपले योगदान द्यावे, असे आवाहन लातूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे.गणेशोत्सवातील उत्साहाला सामाजिक बांधिलकीची जोड आणि हेल्मेट जनजागृतीला मंडळांची साथ मिळाल्यास लातूर जिल्ह्यात अपघातांमधील जीवितहानी कमी करण्याच्या पोलिसांच्या प्रयत्नांना निश्चितच मोठे बळ मिळणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi