Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
वैद्यकीय सेवा देतांना समाजसेवेचे व्रत जोपासा : खा. डॉ.अमोल कोल्हे

वैद्यकीय सेवा देतांना समाजसेवेचे व्रत जोपासा : खा. डॉ.अमोल कोल्हे

नाशिक, 02 जुलै (हिं.स.)। आपल्या दैनंदिन कामकाजात सातत्याने रुग्णांची सेवा घडत राहाणार आहे. परंतु आपण समाजाला, राष्ट्राला काय दिले असा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. वैद्यकीय सेवा प्रदान करतांना समाजसेवेचे व्रत जोपासल्यास व्यापक सामाजिक बदल घडू शकतील, असा विश्वास अभिनेते व खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले.

इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) नाशिक शाखेतर्फे डॉक्टर्स डेनिमित्त आयोजित जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास प्रख्यात मानसोपचारतज्ज्ञ आणि मॅगसेसे पुरस्कार विजेते पद्मश्री डॉ. भारत वाटवाणी, आयएमए नाशिक शाखेचे अध्यक्ष डॉ.विशाल पवार, सचिव डॉ.पंकज भट व पुरस्कारार्थी उपस्थित होते.

खासदार डॉ.अमोल कोल्हे म्हणाले, आपल्या सभोवताली काय घडते आहे, याची जाणीव डॉक्टर या भूमिकेतून आपल्याला असायला हवी. तसेच समाजाच्या उथ्थानासाठी आपल्या हातून कार्य घडणे अपेक्षित आहे.

डॉ.भारत वाटवाणी यांनी सामाजिक कार्यतून घडणार्या परीवर्तनाचा लेखाजोखा मांडला. आज समाजातील अनेक उपेक्षितांना मदतीची आवश्यकता आहे. त्यांना माणूसकीचा हात देतांना अडचणीतून मुक्त करण्यास हातभार लावण्याचे आवाहन त्यांनी केले. मानवी जीवनाची खरी प्रेरक शक्ती ही अंतःकरणाची संवेदनशीलताच असायला हवी. हीच ती भावना आहे, जी माणसाला सभोवतालच्या इतर माणसांच्या सुखादुःखात धावून जाण्यास प्रवृत्त करते. अखेरच्या प्रवासात मोजली जाते ती हीच संवेदनशीलता; कोणतीही पदकं, पुरस्कार किंवा भौतिक सुबत्ता नव्हे. असे प्रतिपादन त्यांनी केले .

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना आयएमए नाशिक शाखेचे अध्यक्ष डॉ.विशाल पवार म्हणाले, आयएमए नाशिकमध्ये जीवनगौरव पुरस्कारांचे वितरण १९९० पासून केले जाते आहे. गेली ३५ ते ३६ वर्षे ही परंपरा अखंडितपणे सुरु आहे. ही आयएमए नाशिकसाठी प्रतिष्ठेची बाब आहे. या पुरस्काराची निवड करतांना सेवा ज्येष्ठता, आयएमएसाठी दिलेले योगदान, संस्थांच्या कार्यक्रमातील सहभाग, तसेच वैद्यकीय व्यवसायासोबत समाजासाठी वैद्यकीय कार्य या सर्व बाबींचा विचार केला जातो. पुरस्कारार्थ्यांची निपक्ष व पारदर्शक पद्धतीने निवड होण्यासाठी समिती गठीत केली होती. या समितीने निष्ठेने ही जबाबदारी पार पाडल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो. आयएमए डॉक्टरांसोबत समाजासाठीदेखील काम करणारी संस्था असल्याचे सांगत नुकताच राबविलेल्या उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. सचिव डॉ.पंकज भट यांनी आभार मानले. पुरस्कार निवड समिती मध्ये डॉ. पंकज गुप्ता, डॉ. विजय घाडगे, डॉ. हेमंत सोननीस यांनी जबाबदारी सांभाळली.

चौकट-

*जीवनगौरव पुरस्काराचे सन्मानार्थी डॉक्टर..*

या कार्यक्रमात ज्येष्ठ डॉक्टरांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यामध्ये डॉ. रत्ना अष्टेकर, डॉ. विजय अहिरराव, डॉ. रुमी पटेल, डॉ. रामकांत पाटील, डॉ. अभयसिंह वालिया, डॉ. समीर चंद्रात्रे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रारंभी पुरस्कारार्थींच्या कार्याचा आढावा घेणारा लघुपट दाखविण्यात आला. पुरस्कारार्थींनी मनोगत व्यक्त केल्यानंतर त्यांचा मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

चौकट:

*रक्तदान शिबिरास प्रतिसाद...*

आयएमए नाशिक शाखेतर्फे डॉक्टर्स डेनिमित्त रोटरी क्लब ऑफ नाशिक गोदावरी यांच्या विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात विक्रमी 102 ब्लड बॅग संकलन करण्यात आल्या.सकाळी झालेल्या या शिबिरास डॉक्टरांसह सर्व सामान्य नागरिकांना प्रतिसाद देत रक्तदान शिबिर केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi