Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
वर्धा : पावसाळी पर्यटनासाठी जलाशयांवर वाढली गर्दी; दोन बुडीत मृत्यूनंतर सतर्कतेचा इशारा

वर्धा : पावसाळी पर्यटनासाठी जलाशयांवर वाढली गर्दी; दोन बुडीत मृत्यूनंतर सतर्कतेचा इशारा

र्धा, ४ ऑगस्ट (हिं.स.) : जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर नद्या आणि धरणांमधील पाण्याची पातळी वाढली असून पावसाळी पर्यटनासाठी विविध जलाशयांवर पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र, गत चार दिवसांत पाण्यात बुडून दोन जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनांमुळे पर्यटनस्थळांवरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

पवनार येथील धाम नदी, सेलू तालुक्यातील रिधोरा धरण तसेच धाम, बोर, पंचधरा आणि लालनाला यांसह विविध नद्या व जलाशयांवर दररोज शेकडो पर्यटक भेट देत आहेत. धाम नदीतील वाढलेला प्रवाह, खोल पाण्याचा अंदाज न येणे आणि धोकादायक ठिकाणी पर्यटकांनी पाण्यात उतरणे यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. रिधोरा धरण परिसरातही सुट्टीच्या दिवशी युवक-युवती आणि कुटुंबीयांची मोठी गर्दी होत असून, पुरेशा सुरक्षा व्यवस्थेअभावी दुर्घटनांची शक्यता वाढत आहे.

येत्या स्वातंत्र्यदिनाच्या सलग सुट्ट्यांमुळे जिल्ह्यातील जलाशयांवर पर्यटकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे.

सेवाग्राम पोलिस ठाण्याचे ठाणेदार देवेंद्र ठाकूर यांनी नागरिकांना नदी-नाल्यांच्या वाढलेल्या पाणीपातळीची आणि वेगवान प्रवाहाची दखल घेऊन विशेष खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले आहे. खोल पाण्यात उतरणे, धोकादायक ठिकाणी सेल्फी काढणे किंवा पुराच्या पाण्याजवळ जाणे टाळावे. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असून, एका चुकीमुळे मोठी जीवितहानी होऊ शकते. सुरक्षितता ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

----------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi