वर्धा, 01 सप्टेंबर (हिं.स.)। शहरातील रस्ते अपघातांना प्रतिबंध घालण्यासह वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम राबवली. २४ ते ३० ऑगस्ट २०२६ या कालावधीत राबविण्यात आलेल्या या मोहिमेत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल १, २२५ वाहनचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांच्याकडून १८ लाख ७१ हजार ३५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
या विशेष मोहिमेदरम्यान १८ वर्षांखालील मुलांकडून वाहन चालविणे, विनापरवाना वाहन चालविणे, हेल्मेट व सीट बेल्टचा वापर न करणे, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, ट्रिपल सीट आणि राँग साईडने वाहन चालविणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे, १८ वर्षांखालील अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देणाऱ्या पालक आणि वाहनमालकांनाही कायद्यानुसार जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलांना कोणत्याही परिस्थितीत मोटार वाहन चालविण्यास देऊ नये. मुलांच्या आणि रस्त्यावरील इतर नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पालकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच भविष्यातही ही कारवाई अशीच सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल आणि अप्पर पोलिस अधीक्षक यांच्या थेट मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेचे नेतृत्व जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेचे प्रभारी साहाय्यक पोलिस निरीक्षक विजयकुमार घुले, शहर ठाण्याचे ठाणेदार नागेशकुमार चतरकर, रामनगरच्या ठाणेदार पाैर्णिमा राखुंडे आणि शहर वाहतूक शाखेसह पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी केली.
रस्त्यावरील अतिक्रमणांना दणका
वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या घटकांवरही पोलिसांनी या मोहिमेत लक्ष केंद्रित केले होते. शहरातील प्रमुख आणि गजबजलेले रस्ते असलेल्या आर्वी चौक आणि बजाज चौक येथे रस्त्यावर भाजीपाला-फळ विक्रीच्या हातगाडी लावून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला. १५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
----------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी

