Dailyhunt
वसंत व्याख्यानमालेच्या ज्ञानयज्ञाचा आजपासून शुभारंभ

वसंत व्याख्यानमालेच्या ज्ञानयज्ञाचा आजपासून शुभारंभ

नाशिक, 30 एप्रिल (हिं.स.)।

: नाशिकची 103 वर्षांची वैभवशाली परंपरा असलेल्या 'वसंत व्याख्यानमालेच्या ज्ञानयज्ञास उद्या (दि. 1 मे) पासून सुरुवात होत आहे. गोदाघाटावरील देवमामलेदार यशवंत महाराज पटांगणात रोज सायंकाळी 7.15 वाजता ही व्याख्याने होतील.

यंदाच्या या ज्ञानयज्ञाचे पहिले पुष्प अयोध्या येथील श्री राम मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष संत गोविंददेव गिरी हे गुंफणार आहेत. तर महापौर हिमगौरी आहेर- आडके यांच्या हस्ते व्याख्यानमालेचे उद्घाटन होईल.

यावेळी पाहुण्यांच्या हस्ते तथागत गौतम बुध्द यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येईल व बुध्द वंदना सादर होईल. तसेच, 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त मराठा हायस्कूलच्या साधारण 40 विद्यार्थ्यांचा समूह 'राज्यगीत' सादर करणार आहे. मुख्याध्यापक श्री. पी. के. थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगीत शिक्षक दिनकर दांडेकर या समूहाचे संचालन व संगीत संयोजन करतील. त्याचप्रमाणे किर्ती कलामंदिरच्या विद्यार्थिनी 'वंदे मातरम'वर कलाविष्कार सादर करणार आहेत. हा कलाविष्कार त्यांनी यापूर्वी दिल्ली येथे कर्तव्य पथ आणि लाल किल्ल्यावर प्रजासत्ताक दिनी सादर केलेला आहे. त्यांना आदिती पानसे- नाडगौडा यांचे मार्गदर्शन लाभले आहे. यानंतर संत गोविंददेव गिरी यांचे 'कथा तथागताची : संदेश समतेचा, करूणेचा, प्रज्ञेचा! अर्थात तथागत गौतम बुध्द' या विषयावर व्याख्यान होईल. तत्पूर्वी महापौर हिमगौरी आहेर- आडके यांच्या हस्ते व्याख्यानमालेचे उदघाटन होईल. उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समितीचे सभापती मच्छिंद्र सानप, विरोधी पक्षनेते प्रथमेश गीते प्रमुख पाहुणे असतील. या उद्घाटन कार्यक्रमासह संपूर्ण व्याख्यानमालेचा नाशिककरांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी, रामतीर्थ सेवा समितीचे अध्यक्ष जयंत गायधनी, स्वागत समितीचे अध्यक्ष राजेंद्र गायकवाड यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi