परभणी, 30 मे: परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ ला नवी दिल्लीस्थित Confederation of Horticulture Associations of India (CHAI) या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेकडून प्रतिष्ठेचा 'इन्स्टिट्युशनल फेलो ऑफ CHAI-2026' पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
हा सन्मान हरियाणाचे मुख्यमंत्री Nayab Singh Saini यांच्या हस्ते विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणि यांनी स्वीकारला.
हरियाणातील महाराणा प्रताप हॉर्टिकल्चरल युनिर्व्हसिटी येथे आयोजित CHAI च्या 15 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कृषी शिक्षण, संशोधन आणि विस्तार कार्यातील उल्लेखनीय योगदान तसेच उद्यानविद्या क्षेत्राच्या विकासासाठी केलेल्या सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत विद्यापीठाला हा सन्मान बहाल करण्यात आल्याची माहिती CHAI चे संस्थापक व अध्यक्ष डॉ. एच.पी. सिंग यांनी दिली.
यावेळी कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी हा सन्मान मराठवाड्यातील शेती विकासासाठी विद्यापीठाने केलेल्या कार्याचा गौरव असल्याचे सांगितले. या पुरस्कारामुळे भविष्यात अधिक जोमाने कार्य करण्याची प्रेरणा मिळेल तसेच विद्यापीठाला राष्ट्रीय स्तरावर नवे स्थान प्राप्त होण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले.
सन 1972 मध्ये स्थापन झालेल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने गेल्या पाच दशकांत कृषी शिक्षण, संशोधन आणि तंत्रज्ञान प्रसार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विद्यापीठाने विविध पिकांचे 160 हून अधिक वाण विकसित केले असून 60 पेक्षा अधिक शेती अवजारे आणि 1100 हून अधिक कृषी तंत्रज्ञान व शिफारसी विकसित केल्या आहेत.
हवामान बदल, कोरडवाहू शेती, नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन आणि शाश्वत शेती या विषयांवर विशेष भर देत असलेल्या विद्यापीठाकडे 16 सलग्न आणि 40 मान्यताप्राप्त महाविद्यालयांचे जाळे आहे. आजपर्यंत विद्यापीठाने सुमारे 1.27 लाख कुशल मनुष्यबळ तयार केले असून 19 संशोधन केंद्रे, 23 अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प आणि कृषी विज्ञान केंद्रांद्वारे आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू आहे.
डिजिटल कृषी, कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन तंत्रज्ञान आणि कृषी यांत्रिकीकरण यांसारख्या आधुनिक क्षेत्रांतही विद्यापीठ सक्रियपणे कार्यरत असून या राष्ट्रीय सन्मानामुळे विद्यापीठाच्या शैक्षणिक, संशोधन आणि विस्तार कार्याची देशपातळीवर दखल घेतली गेल्याची भावना व्यक्त होत आहे.
--------------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis
