Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
विधी सेवा प्राधिकरणाचा PLV प्रशिक्षण उपक्रम यशस्वी

विधी सेवा प्राधिकरणाचा PLV प्रशिक्षण उपक्रम यशस्वी

रायगड, 01 ऑगस्ट (हिं.स.)। : प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड-अलिबागचे अध्यक्ष एस. बी. अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने विधी स्वयंसेवक (PLV) प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

या प्रशिक्षणात कायदेविषयक ज्ञान, सामाजिक उत्तरदायित्व आणि गरजू नागरिकांना मोफत कायदेशीर मदत उपलब्ध करून देण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी ॲड. तनुष्का पेडणेकर यांनी प्रास्ताविक करून प्रशिक्षणाची उद्दिष्टे स्पष्ट केली. डेप्युटी चीफ LADCS ॲड. मनीषा नागावकर यांनी PC & PNDT कायदा या विषयावर मार्गदर्शन करत स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी जनजागृतीची आवश्यकता अधोरेखित केली. मुलगा-मुलगी समानतेचा विचार समाजात रुजविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

डॉ. विनायक पाटील यांनी गर्भलिंग निदानासारख्या बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी डॉक्टर व संबंधितांवर कायद्यानुसार कठोर कारवाईची तरतूद असल्याचे स्पष्ट केले. PLV सुशील सायकर यांनी विधी स्वयंसेवकांच्या कर्तव्ये व जबाबदाऱ्यांवर मार्गदर्शन केले, तर शैलेश कोंडस्कर यांनी क्षेत्रातील कामाचे अनुभव सांगून समाजसेवेची प्रेरणा दिली.

अध्यक्षीय भाषणात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव रेवत कंटे यांनी विधी स्वयंसेवकांनी कायदेशीर चौकटीत राहून तळागाळातील गरजू नागरिकांना मोफत कायदेशीर मदत मिळवून देण्यासाठी सक्रिय भूमिका बजावावी, असे आवाहन केले.

कार्यक्रमास ॲड. अनंत डी. पाटील, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधिकारी, पॅनेल वकील, विधी स्वयंसेवक आणि प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रत्यक्ष उपस्थित राहू न शकलेल्या स्वयंसेवकांसाठी ऑनलाइन प्रशिक्षणाचीही व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाचा समारोप ॲड. तनुष्का पेडणेकर यांच्या आभार प्रदर्शनाने झाला.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi