Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
विद्यार्थ्यांनी स्वतंत्र विचार आणि उद्योजकतेचा स्वीकार करावा : राज्यपाल

विद्यार्थ्यांनी स्वतंत्र विचार आणि उद्योजकतेचा स्वीकार करावा : राज्यपाल

सोलापूर, 30 जुलै (हिं.स.)।

जच्या स्पर्धात्मक आणि वेगाने बदलणाऱ्या जगात केवळ तांत्रिक ज्ञान पुरेसे नसून संवाद कौशल्य, डिजिटल व कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) साक्षरता, चिकित्सक विचार, सर्जनशीलता, नेतृत्व आणि मजबूत नैतिक मूल्येही तितकीच महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.

विद्यार्थ्यांनी जिज्ञासू वृत्ती जपून स्वतंत्र विचार करावा, उद्योजकतेचा स्वीकार करावा आणि आयुष्यभर ज्ञान संपादन करत राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या २२ व्या पदवीप्रदान समारंभात ते बोलत होते. यावेळी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, माजी खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे, ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मभूषण प्रा. डॉ. ज्येष्ठराज भालचंद्र जोशी, सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री गिरीश प्रभुणे, प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

समारंभात राज्यपालांच्या हस्ते ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मभूषण प्रा. डॉ. ज्येष्ठराज भालचंद्र जोशी यांना मानद 'डी.एस्सी.' तर सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री गिरीश यशवंत प्रभुणे यांना मानद 'डी.लिट.' पदवी प्रदान करून गौरविण्यात आले.

सुवर्णपदक विजेत्यांमध्ये विद्यार्थिनींचे प्रमाण सर्वाधिक असल्याबद्दल समाधान व्यक्त करताना राज्यपाल म्हणाले, मुलींचे शैक्षणिक यश हे देशातील तरुण महिलांच्या वाढत्या आत्मविश्वासाचे आणि नव्या आकांक्षांचे प्रतीक आहे. आजन्म शिक्षण हीच यशाची गुरुकिल्ली असून सचोटीशी कधीही तडजोड करू नका आणि आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजहितासाठी करा, असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

सोलापूर विद्यापीठाने कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, जैवतंत्रज्ञान, नॅनोसायन्स, सायबर सुरक्षा, फूड टेक्नॉलॉजी तसेच शिकाऊ उमेदवारीवर आधारित अभ्यासक्रम सुरू केल्याचे कौतुक करताना राज्यपालांनी या अभ्यासक्रमांमुळे विद्यार्थ्यांना भविष्यातील रोजगाराच्या संधींसाठी सक्षम बनण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच विद्यापीठाने राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी (एनआयआरएफ) मध्ये उच्च स्थान मिळविण्यासाठी प्रयत्न वाढवावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

तंत्रज्ञानाचा स्वीकार करताना मानवता, सहानुभूती आणि करुणा या मूल्यांचे भान ठेवणे आवश्यक असल्याचे सांगत राज्यपालांनी विद्यापीठे ही केवळ पदवी प्रदान करणारी केंद्रे न राहता संशोधन, नवोपक्रम, उद्योजकता आणि राष्ट्रनिर्मितीची केंद्रे बनली पाहिजेत, असे मत व्यक्त केले. शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे सर्वात प्रभावी साधन असून न्याय, समानता, सर्वसमावेशकता आणि पर्यावरणीय जबाबदारी या मूल्यांना शिक्षणातून चालना मिळाली पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.

सोलापूरच्या औद्योगिक आणि उद्योजकीय परंपरेचा उल्लेख करताना राज्यपाल म्हणाले की, नवोपक्रमाला प्रोत्साहन, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना बळ, मूल्यवर्धित उद्योगांची निर्मिती आणि तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देत हा वारसा पुढे नेण्याची गरज आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi