Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
'विषमुक्त अन्न'ची वाढती मागणी; रायगडात सेंद्रिय शेतीला बळ

'विषमुक्त अन्न'ची वाढती मागणी; रायगडात सेंद्रिय शेतीला बळ

रायगड, 30 मे (हिं.स.)। जिल्ह्यातील शेतकरी आता पारंपरिक रासायनिक शेतीपेक्षा सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीकडे अधिक प्रमाणात वळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. वाढते उत्पादन खर्च, जमिनीची घटती सुपीकता, हवामान बदलाचे परिणाम आणि विषमुक्त अन्नधान्याची वाढती मागणी यामुळे रासायनिक खतांच्या वापरात लक्षणीय घट झाली आहे.

कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार, २०२१-२२ मध्ये जिल्ह्यात १७ हजार ३०३ मेट्रिक टन रासायनिक खतांचा वापर झाला होता. तो २०२५-२६ मध्ये १२ हजार ४८४ मेट्रिक टनांवर आला आहे. गेल्या पाच वर्षांत खतांच्या वापरात मोठी घट झाल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

पूर्वी भात, भाजीपाला, फळबाग आणि फुलशेतीसाठी मोठ्या प्रमाणावर युरिया, डीएपी आणि इतर रासायनिक खतांचा वापर केला जात होता. मात्र सततच्या वापरामुळे जमिनीचा पोत बिघडू लागल्याने अनेक शेतकऱ्यांनी शेणखत, गांडूळखत, जीवामृत आणि जैविक खतांचा वापर सुरू केला आहे. अलिबाग, पेण, रोहा, माणगाव, महाड आणि पोलादपूर तालुक्यांत नैसर्गिक शेतीचे प्रयोग वाढत आहेत.

औद्योगिकीकरणामुळे शेती क्षेत्रातही घट झाली आहे. मागील दहा वर्षांत रायगडमधील सुमारे ५४ हजार हेक्टर शेती क्षेत्र कमी झाल्याने खतांच्या वापरावर परिणाम झाला आहे. तसेच अनियमित पाऊस, अवकाळी पाऊस आणि वाढते तापमान यामुळे कमी खर्चिक नैसर्गिक शेतीचा पर्याय शेतकरी स्वीकारत आहेत.

कृषी विभागाकडून सेंद्रिय शेतीसाठी प्रशिक्षण, अनुदान आणि तांत्रिक मार्गदर्शन दिले जात असल्यानेही या बदलाला चालना मिळत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi