HW मराठी
आजचा दिवस माझ्या जीवनातील अविस्मरणीय क्षण ! मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंची भावनिक प्रतिक्रिया

मुंबई । शिवसेनाप्रमुख आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ९५ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा आज (२३ जानेवारी) पार पडला. बाळासाहेब ठाकरेंचा पूर्णाकृती पुतळा कुलाबा परिसरातील श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात उभारण्यात आला आहे. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्य़क्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह सर्वपक्षीय नेते यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण झाले. दरम्यान, या सोहळ्यात यावेळी उद्धव ठाकरे भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले की, 'आजचा दिवस हा माझ्या जीवनातील अविस्मरणीय क्षण आहे. हा क्षण कायम लक्षात राहणारा आहे. आज या सोहळ्याला सर्व पक्षांचे नेते पक्षीय मतभेद विसरून उपस्थित राहिले. त्या सर्वांचेच मी आभार मानतो', अशी प्रतिक्रिया यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधत आज त्यांच्या पुतळ्याच्या अनावरण करण्यात आले आहे. दरम्यान, शिवसेनेसाठी हा एक मोठा सोहळा होता.