Sunday, 24 Jan, 3.52 pm HW Marathi

HW मराठी
बर्ड-फ्लूची भीती पळवण्यासाठी नागपूरमध्ये चिकन- अंडी महोत्सवाचे आयोजन

नागपूर | गेल्या बऱ्याच दिवसांपासून देशभरात बर्ड फ्लूच्या संसर्गानं थैमान घातल्याचे पाहायला मिळत आहे. सुरुवातीला महाराष्ट्रात हा संसर्ग मोठ्या प्रमाणात नसला तरीही काही दिवसांनी राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्ल्यूच्या संसर्गाच्या घटना मोठ्या संख्येने पाहायला मिळाल्या. ज्यामुळे हजारो पक्षी मारण्यातही आले. एकिकडे पक्ष्यांमध्ये अतिशय झपाट्यानं पसरणाऱ्या या संसर्गाची दहशत असतानाच दुसकरीकडे चिकन आणि अंडी खाणाऱ्यांनीही आता या गोष्टींकडे भीतीपोटी पाठ फिरवली आहे.

बर्ड फ्लूच्या भीतीमुळे चिकन आणि अंडी खाण्याबाबत अनेकांमध्ये संभ्रम आहे. लोकांमधील हाच संभ्रम दूर करण्यासाठी नागपुरात एक अनोखी शक्कल लढवण्यात आली. महाराष्ट्र पशुविज्ञान, मत्स्यपालन विद्यापीठात चक्क चिकन आणि अंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं होते. पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांच्या उपस्थित हा महोत्सव पार पडला. यावेळी बर्ड फ्लूबाबत चुकीची माहिती पसरवण्याऱ्यांवर सरकार कठोर कारवाई करेल असा इशाराही केदार यांनी दिला.

माणसाला बर्ड फ्लू झालेला दाखवल्यास रोख पारितोषिक देण्याच्या घोषणेचा त्यांनी पुनरुच्चार केला. दरम्यान, अंडी आणि चिकन महोत्सवात त्यापासून तयार केलेल्या विविध पदार्थांवर खवय्यांनी चांगलाच ताव मारला. पशु संवर्धन विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही यानिमित्ताने रविवारचा पुरेपूर आस्वाद घेतला. खुद्द पशु संवर्धन मंत्री सुनील केदार यांनी स्वतः मात्र चिकन खाल्ले नाही. ते स्वतः शाकाहारी असल्यामुळे चिकन खात नसल्याचे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: hwmarathi.in
Top