महाराष्ट्र
चंद्रकांत पाटलांचं गणित कच्चं असून भाजप शेवटून पहिला येणारा पक्ष, सत्तारांचा टोला

धुळे | राज्यात नुकत्याच ग्रामपंचायत निवडणुका पार पाडलेल्या. ग्रामापंचायत निवडणुकीत भाजपला सर्वात जास्त जागा मिळाल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केल्यानंतर महसूल राज्यमंत्री अब्दूल सत्तार यांनी त्यांचा दावा फेटाळला आहे. भाजप खोटी आकडेवारी देणारा पक्ष असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच चंद्रकांत पाटलांचं गणित कच्चं असून भाजप शेवटून पहिला येणारा पक्ष असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे. 'भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे गणित कच्चं आहे. भाजकडून खोटी आकडेवारी सांगितले जाते. राज्याच्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप हा शेवटून एक नंबर आलेला पक्ष आहे,' असं अब्दुल सत्तार म्हणाले आहेत.
दरम्यान, राज्यात ३४ जिल्ह्यांमध्ये १२ हजार ७११ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. १८ जानेवारीला मतमोजणीची प्रक्रिया पार पडली. ग्रामपंचायतीच्या निवडणुका या पक्षाच्या चिन्हावर होत नसल्यामुळे कोणत्या पक्षाला किती ग्रामपंचायती मिळाल्या हे सांगणं कठीण आहे. मात्र, निकाल हाती आल्यानंतर प्रत्येक पक्षाने आपणच सर्वात चांगली कामगिरी केल्याचा दावा केला होता.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपने ६ हजार जागा जिंकल्याचा दावा केला होता. तर काँग्रेसनेही ४ हजार जागा जिंकल्याचं म्हटलं होतं. दुसरीकडे आमचाच पक्ष राज्यात एक नंबर राहिल्याचं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले होते. त्यांनतर आता उब्दुल सत्तार यांनी चंद्रकांत पाटलांचं गणित कच्चं असून ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाचा नंबर शेवटून पहिला आल्याची मिश्किल टिप्पणी केली आहे.