Sunday, 11 Apr, 11.26 am HW Marathi

HW मराठी
देशात आजपासून 'लस उत्सव'ला सुरुवात, सर्वाधिक नागरिकांपर्यंत लस पोहोचवण्याचा हेतू

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशांनंतर आजपासून (११ एप्रिल) ते १४ एप्रिलपर्यंत देशभरात 'लस उत्सव' आयोजित करण्यात आला आहे. सर्वाधिक नागरिकांपर्यंत लस पोहोचवणं हा यामागचा मुख्य हेतू आहे. 'लस उत्सव' या मोहिमेअंतर्गत उत्तर प्रदेश आणि बिहारसारख्या अनेक राज्यांतील नागरिकांना लसीकरणासाठी आवाहन करण्यात येणार आहे. त्यासाठी काही नेतेमंडळींनीही पुढाकार घेत नागरिकांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसीबाबतची जनजागृती करण्यासाठी योगदान दिलं आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं काल (१० एप्रिल) दिलेल्या माहितीनुसार भारतात गेल्या ८५ दिवसांमध्ये १० कोटी लसी देण्यात आल्या आहेत. यामुळं जगातील सर्वात वेगवान लसीकरण मोहिम राबवणारा भारत हा पहिलाच देश ठरत आहे. चीनला १० कोटी लसी देण्यासाठी १०२ दिवासांचा कालावधी लागला होता.

लस वाया जाऊ देऊ नका, पंतप्रधानांचं आवाहन

लस कोणत्याही प्रकारे वाया जाऊ दिली जाणार नाही, यावर आपण लक्ष दिलं पाहिजे यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आग्रही दिसले, 'अनेकदा यामुळं परिस्थिती आणि प्रसंग बदलण्यास मदत होते. महात्मा जोतिबा फुले यांची जयंती ११ एप्रिलला आहे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती १४ एप्रिलला आहे. आपण लस उत्सवाचं आयोजन करु शकतोय का? तशी वातावरणनिर्मिती करु शकतोय का? एका खास मोहिमेअंतर्गत आपण अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत ही लस पोहोचवली पाहिजे. लस कशा पद्धतीनं वाया जाणार नाही, यावर लक्ष दिलं पाहिजे. 'लस उत्सव' दरम्यानच्या चार दिवसांत लस वाया गेली नाही, तर आपली लसीकरण क्षमताही वाढलेली असेल.'

दरम्यान, एकिकडे लस उत्सवाची हाक पंतप्रधानांनी दिलेली असतानाच महाराष्ट्रात मात्र लसींचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यातच लसींच्या पुरवठ्यावरुन आता वेगळंच राजकारणही तापू लागलं आहे. त्यामुळं राजकारण बाजूला सारत नेतेमंडळी, सत्ताधारी आणि विरोधकांनी नागरिकांच्या हितासाठी एकत्र येण्याचाच सूर जनसामान्यांतून आळवला जात आहे. मात्र, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनीही महाराष्ट्राला सगळ्यात जास्त कोरोना लस दिल्याचे म्हटले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: hwmarathi.in
Top