Wednesday, 02 Dec, 2.15 pm HW Marathi

HW मराठी
Pfizer-BioNTechच्या कोरोना लशीला परवानगी, पुढच्या आठवड्यापासून नागरिकांना लस दिली जाणार

मुंबई | संपूर्ण जगाचे लक्ष ज्या कोरोना लसीकडे लागले आहे. त्याबद्दल महत्वाची बातमी हाती आली आहे. कोरोनावरील जगातील पहिली लस पुढच्या आठवड्यात उपलब्ध होणार आहे. ब्रिटन सरकारने फायझर बायोएनटेकच्या लशीला परवानगी दिली असून, पुढच्या आठवड्यापासून ब्रिटनमध्ये नागरिकांना लस दिली जाणार आहे. कोरोनावरील लशीला परवानगी देणारा ब्रिटन हा पहिला देश ठरला आहे. काही दिवसांपूर्वीच फायझरने कोरोनावर प्रभावी लस तयार करण्यात यश आल्याची घोषणा केली होती. तसेच, ही लस कोणत्या क्रमाने द्यायची हे ब्रिटनची आरोग्य सेवा ठरवणार आहे. आरोग्य कर्मी, घरातील माणसे, वृद्ध माणसे या सगळ्यांचा क्रम निश्चित केला जाणार आहे.

जगाला वेठीस धरणाऱ्या कोरोनावर मात करण्यासाठी सगळीकडेच युद्धपातळीवर लस निर्मितीचे प्रयत्न सुरू आहेत. कोरोना महामारीविरोधातील लढाईत ब्रिटनला एक आशेचा किरण दिसला आहे. फायझर आणि बायोएनटेकच्या लशीचा मार्ग मोकळा झाला आहे. ब्रिटन सरकारने फायझर व बायोएनटेकच्या लशीला आज परवानगी दिली. फायझरची लस पुढील आठवड्यापासून ब्रिटनमध्ये उपलब्ध होणार आहे. ब्रिटन सरकारनं यासंदर्भात निवेदन प्रसिद्ध केलं आहे. सुरक्षितता, गुणवत्ता आणि परिणामकारक या सर्व मानकांमध्ये लस योग्य ठरली असल्याचं सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.

अमेरिका आणि युरोपियन युनियनकडून लस निर्मितीचे प्रयत्न सुरू आहेत. युरोप किंवा अमेरिकेत सर्वात आधी लस येण्याचा अंदाज व्यक्त केला जात असताना करोनावरील लशीला मान्यता देणारा ब्रिटन जगातील पहिला देश ठरला आहे. फायझरची लस कोरोनावर ९५ टक्के प्रभावी असून, जर्मनीतील औषध निर्माण कंपनी बायोएनटेक आणि अमेरिकनस्थित कंपनी फायझरने युरोपियन युनियनकडे लशीच्या नोंदणीसाठी अर्ज केला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: hwmarathi.in
Top