Friday, 03 Jul, 2.31 pm HW Marathi

HW मराठी
विस्तारवादाचं युग संपलं, हे युग विकासवादाचं आहे

लेह - लडाख | भारत चीन दरम्यान सुरू असलेल्या संघर्षाचे पडसाद जगभरात उमटू लागले आहेत. आज सकाळी (३ जुलै) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक लेहला जाऊन सीमेवरील सैनिकांची भेट घेतली आणि सीमेची पाहणी देखील केली.

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तैनात असलेल्या जवानांचे मनोबल उंचावण्या सोबत तेथील परिस्थिती समजून घेणे, हा या दौऱ्यामागचा मुख्य उद्देश होता. पूर्व लडाखमध्ये पँगाँग टीएसओसह गलवान खोऱ्यावर दावा सांगणाऱ्या चीनसाठी सुद्धा हा एक सूचक इशारा आहे. त्यामुळेच पंतप्रधान मोदींचा हा दौरा अनेक अर्थांनी महत्वाचा आहे.

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी नमो येथुन भाषण देत सर्व सैनिकांचे मनोबल वाढवले. देशाची सुरक्षा तुमच्या हातात आहे, तुमच्यावर केवळ माझाच नव्हे तर संपूर्ण देशाचा विश्वास आहे. त्यामुळेच देश निश्चिंत आहे, असे त्यांनी म्हटले.

इतकेच नव्हे तर, ही धरती शूरांची आहे, तिचं संरक्षण करणं हाच आपला संकल्प, हा हिमालय जिंकायचा हाच आपला पण आहे, असा विश्वास देखील त्यांनी दिला. तुमचा उत्साह आणि शौर्य, देशाच्या मान-सन्मान आणि संरक्षणासाठी तुमचं समर्पण अतुलणीय आहे. तुम्ही ज्या कठीण परिस्थितीत, बर्फच्छादित प्रदेशात भारत मातेची ढाल बनून सेना आणि संरक्षण करतात त्याचा सामना संपूर्ण जगभरात कुणीही करु शकत नाही.

तुमचं धैर्य या डोंगरांपेक्षाही उंच आहे, जिथे तुम्ही तैनात आहात. तुमची इच्छाशक्ती आजूबाजूंच्या पर्वंताइतकी प्रबळ आहे. आज मी या सर्व गोष्टींचा अनुभव घेत आहे. माझ्या डोळ्यांनी मी बघत आहे. देशाची संरक्षणाची जबाबदारी तुमच्यावर आहे.तुमच्यावर संपूर्ण देशाचा विश्वास आहे. त्याचबरोबर देश निश्चिंत आहे.

तुमचं सीमेवर तैनात असणं ही गोष्ट देशातील नागरिकांना काम करण्यासाठी प्रेरणा देते. आत्मनिर्भर भारताची संकल्प तुमचा त्याग आणि बलिदानामुळे आणखी मजबूत होते. आणि महत्वाचे म्हणजे विस्तारवादाचं युग संपलं आहे, हे युग विकासवादाचं आहे, असेही त्यांनी आपल्या भाषणात म्हटले.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: hwmarathi.in
Top