The Maharashtra Files Marathi Movie : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला 'द महाराष्ट्र फाईल्स' या सिनेमाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. येत्या २९ मे रोजी प्रदर्शित होणारा 'द महाराष्ट्र फाईल्स' हा सिनेमा तांत्रिक बिघाडामुळे आता या दिवशी प्रदर्शित होणार नसल्याचं समोर आलंय.
मात्र लवकरच नव्या तारखेसह हा सिनेमा रसिकांच्या भेटीस येणार आहे. बंजारा समाजाच्या न्यायासाठी लढणारा हा सिनेमा असून याच्या प्रदर्शनाच्या तारखेकडे आता प्रेक्षकांचेही लक्ष लागून राहणार आहे. चित्रपटाची टीम आलेल्या अडथळ्यावर काम करत असून लवकरच प्रदर्शनाची नवी तारीख जाहीर करतील.
'द महाराष्ट्र फाईल्स' चित्रपटाच्या टीजर ट्रेलर आणि गाण्यांनी सोशल मीडियावर आणि प्रेक्षकांच्या मनात घर केल्याच पाहायला मिळालं. यानंतर सगळ्या प्रेक्षकांना २९ मे ची उत्सुकता लागून राहिली होती. मात्र सेन्सॉर बोर्डाच्ने कात्री लावल्याने या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली असल्याचं समोर आलं आहे. असं असलं तरी आता प्रेक्षक वर्गाला जास्त काळ वाट पहावी लागणार नाही कारण हा सिनेमा संघर्षाचा लढा देत जून महिन्यातच प्रदर्शित होईल.
आणखी वाचा – शशांक शेंडे साकारणार रहस्यमय मांत्रिकाची भूमिका, 'घबाडकुंड' चित्रपटातील लूकची चर्चा
चित्रपटाच्या तारखेबाबत निर्माते व दिग्दर्शक संजीवकुमार राठोड यांनी वेदनादायक प्रतिक्रिया देत म्हटलं, "संघर्ष हा वंचित आणि बंजारा समाजाच्या पाचवीलाच पूजलेला आहे. संघर्षाला सामोरे जाऊन येत्या जून महिन्यातच हा चित्रपट महाराष्ट्राच्या तमाम जनतेला चित्रपटगृहात पाहायला मिळेल". 'द महाराष्ट्र फाईल्स’ची निर्मिती, दिग्दर्शन, लेखन, कथा, पटकथा अशी सर्व बाजूंनी चित्रपटाची धुरा संजीव कुमार राठोड यांनी सांभाळली आहे. तर क्रिएटिव्ह दिग्दर्शक आणि सह निर्माते म्हणून शालिनी राठोड यांनी बाजू सांभाळली आहे. तर क्रिएटिव्ह प्रोड्यूसर म्हणून आर्यन राठोड याने बाजू पाहिली.
आणखी वाचा – करण-अर्जुन आले! सुप्रसिद्ध अभिनेत्री लग्नाच्या १० वर्षांनी झाली आई, जुळ्या बाळांना दिला जन्म
या चित्रपटात दिग्गज कलाकार मंडळींची फौज पाहायला मिळणार आहे. अभिनेत्री उषा नाडकर्णी, मंगेश देसाई, वीणा जामकर, सयाजी शिंदे, नागेश भोसले, सुनील गोडसे, सन्नी लिओनी, सपना चौधरी, आर्यन राठोड, गौतमी पाटील, मंगली ही कलाकार मंडळी महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी नितीन सावंत, अजित केतकर आणि सिद्धार्थ कश्यप यांनी सांभाळली आहे. लवकरच चित्रपटाची नवी तारीख घोषित करण्यात येईल, तोवर मात्र प्रेक्षकांना वाट पाहावी लागेल.

