Jui Gadkari Instagram post : 'स्टार प्रवाह' वाहिनीवरील 'ठरलं तर मग' ही मालिका सुरु झाल्यापासून चर्चेत आहे. टीआरपीच्या शर्यतीत तर या मालिकेने कायमच पहिला क्रमांक पटकावला आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राने रसिकांच्या मनात घर केलं आहे.
सायली-अर्जुनच्या जोडीला तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं आहे. महाराष्ट्रातच नव्हेतर परदेशांतही या मालिकेची क्रेझ पाहायला मिळते. आणि आता तर इस्त्राईलसारख्या देशांतून जिथे युद्धमय वातावरण आहे तिथून मालिकेला कौतुकाची छाप मिळाली आहे. इस्त्राईलसारख्या देशांतून मानसिक तणाव दूर करण्यासाठी तेथील भारतीय ठरलं तर मग या फॅमिली बेस मालिका पाहण्याला प्राधान्य देतात. आणि याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे पाहून आता जुईनेदेखील त्यांचे आभार मानले आहेत. इतकंच नाहीतर जुईने पोस्ट शेअर करत टीमच्या मेहनतीला सलाम केला आहे.
ते कुटुंबीय असं बोलताना दिसत आहे की, "आम्ही इस्त्रायलमध्ये स्थायिक आहोत. सध्या इथे काय परिस्थिती आहे हे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. या युद्धामुळे आम्ही मानसिक तणावात असतो. पण, 'ठरलं तर मग' मालिका पाहून छान वाटतं. आम्ही सर्व कुटुंबीय एकत्र मिळून ही मालिका पाहतो. आम्ही कोणताच भाग पाहणं चुकवत नाही, कारण ही मालिका आम्हाला फार आवडते. या मालिकेतील मुख्य जोडी सायली-अर्जुनचा अभिनय आम्हाला खूप आवडतो. याचबरोबर प्रिया सुद्धा फार सुंदर अभिनय करते. तिची भूमिका सुद्धा आम्हाला आवडते. आम्हा सर्वांकडून टीमला खूप-खूप शुभेच्छा".
पोस्ट शेअर करत जुई म्हणाली, "गेले काही दिवस 'ठरलं तर मग' चे ४५ मिनीटांचे एपिसोड रोज सुरु आहेत. हे ऐकायला जरी "हो मग त्यात काय?" असं वाटलं तरी, ते रोज करणं खूपच अवघड आहे. रोजचा (सोम ते रवि) २२ मिनीटांचा भाग असला तरी पुर्ण युनीट अक्षरशः दिवस रात्र काम करत असतं. ॲक्टर्स घरी गेले तरी पोस्टप्रॉडक्शनची मंडळी, एडिटर्स हे Round o clock शिफ्ट्स मध्ये काम करतात. मग रोज ४५ मिनीटचा एपिसोड करणं अजीबात सोप्पं नाही. पुर्ण युनीट या साठी अथक परिश्रम करतं. कधी चीडचीड होते. कधी रडारड. फक्त ॲक्टर्सचीच नाही तर डिरेक्शन, लाईटमेन, स्पॉट, सेटींग, साऊंड, कॅमेरामेन हेअर मेकअप कॉसट्युम या सगळ्यांची डबल युनीटमध्ये तारांबळ ऊडते".
शेवटी तिने म्हटलं, "काहीही झालं तरी ध्येय एकच, एपिसोड थांबता कामा नये आणि अशातच जगाच्या वेगवेगळ्या भागात सुरु असलेल्या युध्द परिस्थितीत अडकलेल्या, मराठी भाषिकही नसलेल्या ईसराएलच्या प्रेक्षकांकडुन कौतुकाची थाप मिळते तेव्हा वाटतं "Its all worth it" आपण आपल्या मालिकेच्या माध्यामातुन अशा परिस्थितीत अडकलेल्या एका कुटुंबाला आनंद देऊ शकलो याचा मला खुप जास्त आनंद आहे. देव करो आणि ते सगळे कायम सुखरुप राहो".

