एखाद्या वन्य प्राण्याची भीती आपल्याला वाटते, ती त्याच्या हिंस्त्रतेमुळे नाही-तर त्याच्याविषयीच्या अज्ञानामुळे. जेव्हा आपण त्याच्या जगात डोकावतो, त्याच्या जगण्याची लढाई समजून घेतो, तेव्हा भीती हळूहळू विरघळत जाते आणि तिची जागा आदर घेतो.
बिबट्याबद्दलची माझी भावना ही अशाच एका दीर्घ प्रवासातून बदलत गेली-भीती, राग, वेदना आणि शेवटी समजूतदारपणाकडे.
प्रतिक मोरे, वन्यजीव अभ्यासक
एखाद्या वन्य प्राण्याची भीती वाटण्याचं मुख्य कारण हे तिची पूर्णपणे माहिती नसणे यामध्ये आहे… जेवढं त्याच्या जवळ जातो. जेवढं त्याचं विश्व कळायला लागतं तेवढं मग त्याच्या मनोभूमिका कळायला लागतात.. आणि मग त्याचा उमदा स्वभाव समजू लागला की मग भीतीची जागा आदर घेतो.. बिबट्याच ही तसंच झालं आहे.. आजही मला तो पहिला दिवस आठवतो.. पाचवीत असताना आम्ही मित्र मंडळी सायकली घेऊन फिरायला गेलो होतो.. संध्याकाळचे पाच सहा वाजले होते.. त्यावेळचे डांबरी रोड सुद्धा जंगलाचा भाग असावेत असेच होते.. गप्पा आणि गोंधळात अचानक एक जनावर आडवं गेलं.. अर्ध्याहून जास्तं मित्रांना तर काही दिसलंच नाही.. पण तरीही शार्दुलने तो बिबट्या होता हे सांगताच उडालेली गाळण आजही आठवते.. तेवढेच अंगावर आलेले रोमांच ही चांगलेच स्मरणात आहेत. ज्या वेगाने सायकली फिरवून आम्ही घर गाठलं होत ते आठवून आजही सर्वांच्या मनात हास्याचे फवारे उडतात.
बिबट्याची पहिली ओळख ही अशी लहानपणीच झालेली.. तिथपासून आजवर झालेला बिबट्याच्या जवळ जाणारा प्रवास हा दुःख तिरस्कार हेटाळणी पासून प्रेमात बदलण्यास अक्षरश वीस एक वर्ष लोटली असावीत. प्राणी प्रेमाची हौस ही लहानपणापासून दांडगी.. अर्थात त्याच पर्यावसान रस्त्यावरची कुत्र्याची पिल्ले घरी आणणे आणि त्यांच्यात बुडून जाणे हे तसे अगदी नैसर्गिक.. तसाच एक कुत्र्याच पिल्लू ज्याच्या आईला बिबट्याने नेल्यावर अक्षरशः अंगावर पडलं.. डोळे उघडण्याच्या आतच त्यांचं मातृछत्र हिरावल गेलं होतं.. आईविना वाढलेली ती पिल्ले माझ्या घरात कशी पोचली ते आता आठवत नाही.. पण एक कुत्री आणि एक कुत्रा मात्र आमच्याकडे वाढला.. बाकी दोन पिल्ले दुसऱ्या ओळखीच्या लोकात गेली.. अगदी डोळे न उघडलेली पिल्ले असल्यामुळे त्याचं सगळच करावं लागत होत.. पण ती जोमाने वाढली.. त्यातला तांबडा कुत्रा त्याच नंतर नाव लाल्याच पडलं. मस्त वाढला.. लहानपणीच्या धक्क्याने असेल किंवा आणि काही असेल पण तो अगदी रागीट बनला होता.. गेटची कडी जरी वाजली तरी लांबवरून क्षणार्धात प्रकट होणारा आणि अख्खं घर डोक्यावर घेणारा तो कुत्रा सर्वत्रच फेमस झाला होता. त्याच्यासाठी पिंजरा बनवला होता.

