Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
जिचं तिचं आकाश" : संघर्षातून झेपावलेल्या ३३ स्त्रियांच्या प्रेरणादायी कथा

जिचं तिचं आकाश" : संघर्षातून झेपावलेल्या ३३ स्त्रियांच्या प्रेरणादायी कथा

मेरिकेत आणि भारतात मुलखावेगळी कामगिरी करीत असलेल्या विविध स्त्रियांच्या प्रेरणादायी जीवन कथा असलेल्या;अमेरिका स्थित लेखिका चित्रा मेहेंदळे ह्यांच्या " जिचं तिचं आकाश " ह्या पुस्तकाचे प्रकाशन येत्या मंगळवारी विले पार्ले ( पूर्व) येथील प्रबोधनकार ठाकरे क्रिडा संकुलाच्या सभागृहात होत आहे.

या प्रकाशन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेविका श्रीमती अंजली सामंत, प्रबोधनकार ठाकरे क्रिडा संकुलाचे संचालक अरविंद प्रभू आणि ग्रंथालीचे विश्वस्त सुदेश हिंगलासपूरकर हे उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी अभिनेत्री रजनी वेलणकर ह्या असून सूत्रसंचालन अलका भुजबळ करणार आहेत. या निमित्ताने या पुस्तकाबद्दल….

देवेंद्र भुजबळ

न्यूज स्टोरी टुडे पोर्टलवर प्रकाशित झालेल्या काही लेखमाला यापूर्वी पुस्तक रुपात प्रकाशित झाल्या आहेत. त्या उपक्रमातील पुढचे पाऊल म्हणजे अमेरिका स्थित लेखिका चित्रा मेहेंदळे यांनी लिहिलेले " जिचं तिचं आकाश " हे पुस्तक होय. या पुस्तकाचे शीर्षकच इतके समर्पक आहे की, त्यावरून पुस्तकाची लगेच कल्पना येऊ शकते.

प्रस्तुत पुस्तकात अमेरिकेतील आणि भारतातील विविध क्षेत्रांतील 33 स्त्रियांच्या प्रेरणादायी जीवन कथा आहेत. ह्या पुस्तकाचे एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे कथा नायिका, लेखिका आणि प्रकाशिका ह्या सर्वच स्त्रिया आहेत. कथा नायिकांप्रमाणे लेखिका आणि प्रकाशिका ह्या दोघींनीही आपापले आकाश कवेत घेतले आहे. आणि त्यामुळेच ह्या पुस्तकाची निर्मिती होऊ शकली आहे.

" जिचं तिचं आकाश " या पुस्तकाच्या निमित्ताने 2017 साली प्रकाशित झालेल्या माझ्या "गगन भरारी " या पुस्तकाची आठवण झाली. या पुस्तकात 26 स्त्रियांच्या यश कथा आहेत. त्याच धर्तीवर आणखी एखादे पुस्तक लिहावे असे मला फार वाटत होते. दरम्यान माझी इतर काही पुस्तके लिहून झाली, पण पूर्णपणे स्त्रियांच्या जीवन कथा असलेले पुस्तक काही लिहून होत नव्हते. आणि अशातच अमेरिकेत राहणार्‍या पण मूळ मुंबईकर असलेल्या चित्राताईंनी "अमेरिकेतील नवदुर्गा " असे सदर पोर्टल वर लिहिण्याची कल्पना मांडली आणि मला ती तात्काळ आवडली. याचे कारण म्हणजे, मला नेहमी असे वाटत आले आहे की, एक तर जगभरच असलेली पुरुष प्रधान संस्कृती, त्या अनुषंगाने निर्माण झालेली समाज रचना, कुटुंब पद्धती, स्त्री पुरुष यांच्यातील नैसर्गिक फरक अशा एक ना अनेक कारणांमुळे स्त्री ला यशस्वी होणे हे पुरुषांपेक्षा हजार पटीने कठीण असते. आजही किती तरी घरात मुलींना, स्त्रियांना यशस्वी होण्यासाठी मुळात त्यांच्या जन्मदात्यांशी, घरातील इतरांशी आणि विवाहानंतर पती आणि सासर कडील मंडळींशी संघर्ष करावा लागतो. स्त्रीच्या संघर्षांची सुरुवात जगाशी लढण्याआधी घरच्यांशी लढण्यापासून होते. अशा परिस्थितीत खंबीरपणे घराबाहेर पडल्यावर पावलोपावली सुरू होतो तो भेदभाव. या भेदभावाला तोंड देतदेत स्त्री ला पुढे जात राहावे लागते. आणि म्हणुन अशा सर्व प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश मिळविणार्‍या स्त्रिया मला फार थोर वाटतात.

आज वरकरणी प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्त्री वाटचाल करीत आहे, असे दिसते. पण एकंदरीत पाहता शंभर टक्के स्त्री पुरुष समानता निर्माण व्हावी यासाठी खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे. स्त्रियांना किती मुस्कटदाबी सहन करत जगावे लागते, याचे एक उदाहरण म्हणुन प्रस्तुत पुस्तकातील "शीळ वादिका " या लेखाकडे पाहता येईल. शीळ मारणे ही आजही पुरुषांची मक्तेदारी आहे. त्यामुळेच विविध देशातील स्त्रिया ऑनलाइन एकत्र येऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेले जयोस्तुते ….हे स्फूर्तीगीत शिळेवर गातात ही अचंबित करणारी गोष्ट एका बातमीचा विषय ठरते.

या पुस्तकातील बहुतेक कथा नायिका ह्या मध्यमवर्ग , उच्च मध्यमवर्गातील असल्यामुळे त्यांचा सर्व जीवन प्रवास सुखकर झाला असेल, होत असेल, असे नाही. त्यांच्या संघर्षाचे स्वरुप निम्नस्तरातील स्त्रियांपेक्षा निश्चितच वेगळे असले तरी, त्यांनाही घरीदारी संघर्ष चुकला असेल, असे मानण्याचे कारण नाही. त्यामुळे त्यांनी मनमोकळेपणाने जशी आपली जीवन कथा चित्राताईंना सांगितली तशीच, खरे म्हणजे त्या पेक्षा अधिक मनमोकळेपणाने, जीवनात त्यांना आलेल्या भल्याबुर्‍या आठवणी, प्रसंग, घटना यासह स्वतः मांडली पाहिजे. मग भले ते माध्यम लेखन असो, आकाशवाणी, दूरचित्रवाणी, समाज माध्यम असो पण त्यांनी व्यक्त होणे आवश्यक आहे. अर्थात ही गोष्ट वाटते तितकी सोपी नक्कीच नाही, कारण त्यात जवळची माणसेच दुखावल्या जाण्याची शक्यता मोठी आहे. येथे मला लेखिका मल्लिका अमरशेख ह्यांच्या " मला उध्वस्त व्हायचंय" मानसी देसाई यांच्या "नाच ग घुमा" , सुनीती देशपांडे ह्यांच्या " आहे मनोहर तरी " , यशोदा पाडगावकर ह्यांच्या "कुणास्तव कुणीतरी" ह्या आत्म कथनपर पुस्तकांची आवर्जून आठवण येत आहे . शेवटी "बरे होण्यासाठी काही वेळा कडू औषध घ्यावेच लागते " असे ते आहे. असो.

लेखिका चित्रा मेहेंदळे यांनी अत्यंत निश्चयाने, नेटाने, असंख्य अडीअडचणींचा सामना करीत ह्या प्रेरणादायी जीवन कथा लिहिल्या आहेत. या सर्व सत्यकथा पुस्तक रुपाने आल्यामुळे त्यांच्या सर्व श्रमांचे सार्थक झाले ह्याचा मला मनस्वी आनंद होत आहे. तसे हे त्यांचे तिसरे पुस्तक आहे. वाचक या पुस्तकाचे नक्कीच स्वागत करतील, अशी अपेक्षा आहे.

पुस्तकाचे नाव :जिचं तिचं आकाश
लेखिका: चित्रा मेहेंदळे
प्रकाशक: न्यूज स्टोरी टुडे.
किंमतः ४०० रुपये
पुस्तकासाठी संपर्क: 9869484800.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Iye Marathichiye Nagari