आज भग्नावस्थेत उभ्या असलेल्या तटबंदी, बुरूज आणि वास्तूंचे अवशेष पाहताना एकेकाळच्या राजवैभवाची कल्पना येते. मात्र, कंधार किल्ला केवळ युद्धे आणि सत्तासंघर्षांचा साक्षीदार नाही; तो राष्ट्रकूटांच्या पराक्रमासोबतच जलव्यवस्थापन, स्थापत्यकला, शिल्पकला, साहित्य, विद्वत्ता आणि लोककल्याणकारी दृष्टिकोनाचा समृद्ध वारसाही जपून आहे.
या किल्ल्याच्या अवशेषांतून उलगडणारा इतिहास म्हणजे मराठवाड्याच्या सांस्कृतिक वैभवाचा एक अनमोल अध्याय !
आरती झोटिंग, नागपूर
9420087986
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित सातवे छत्रपती शिवाजी महाराज मराठी साहित्य संमेलन १५ नोव्हेंबर २०२६ रोजी कंधार येथे संपन्न झाले. या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने कंधारला जाण्याचा योग आला. १४ नोव्हेंबर रोजी मी आणि माझे यजमान अशोक झोटिंग यांनी कंधार किल्ल्याला भेट दिली. किल्ल्याच्या परिसरात पाऊल ठेवताच त्याची भव्यता, ऐतिहासिक महिमा आणि दिव्यतेची अनुभूती मनाला भारावून गेली. आज केवळ अवशेषांच्या रूपात उभा असलेला हा किल्ला आपल्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देतो. त्याच्या भग्न वास्तू, तटबंदी आणि ऐतिहासिक खुणा पाहताना कधीकाळी या गडाने अनुभवलेले सामर्थ्य, वैभव आणि ऐश्वर्य मनाच्या डोळ्यांसमोर उभे राहते.
कंधारचा किल्ला हा भुईकोट किल्ला आहे. हा महाराष्ट्रातील मराठवाडा भागातील नांदेड जिल्हय़ातील कंधार शहरात आहे.नांदेड पासून साधारणतः 40-45 किमी वर आहे. राष्ट्रकूट राजा कृष्ण तिसरा ह्यांनी हा बांधला आहे. कंधारचा किल्ला म्हणजे राष्ट्रकूटांच्या वैभवशाली इतिहासाचा साक्षीदार म्हणता येईल. महाराष्ट्राच्या प्राचिन इतिहासातील एक महत्वपूर्ण पर्वाचा मागोवा ह्या किल्ल्याचा अभ्यास केला असता आपल्याला गवसतो.
राष्ट्रकूटांचे साम्राज्य, राजा कृष्ण तिसरा ह्यांचा पराक्रम, प्राचिन शिलालेख, स्थापत्यकौशल्य, धार्मिक आणि सांस्कृतिक जीवन ह्याचे दर्शन येथे घडते.
कंधारचा भुईकोट किल्ला साधारण २५ एकर परिसरात बांधला गेला आहे. किल्ल्याभोवती दोन स्तरात तटबंदी आहे. २५ फुट खोल १०० फुट रूंद भक्कम खंदक सर्व बाजूंनी आहे.३२ बुरूज आहेत.चार प्रमुख प्रवेशद्वार आहेत.अंबरी बुरूजावर अष्टधातुंनीबनवलेली व्याघ्रमुखी अंबर तोफ मराठवाड्याचे वैभव आजही कायम राखून आहे.किल्ल्यात राणी महाल, दरबार हॉल, जलमहल, शिशमहल, लालमहल, जनानखाना, धान्यकोठारे, बारूदखाना ह्यांचे अवशेष आज ही शिल्लक आहेत. ह्या अवशेषांचे अवलोकन केले असता तात्कालिक प्रशासन, जनजीवन, राजघराण्यातील व्यक्तींचे जीवन कळते.
कंधारच्या इतिहासात संस्कृत,प्राकृत,फारसी,अरबी भाषांचे संदर्भ आढळून येतात.कन्नड भाषेचे पण महत्व दिसते.हिंदू,बौद्ध,जैन परंपरांचे पुराणतत्वीय अवशेष आढळतात.
साहित्यिक दृष्टीने मला काही गोष्टी स्पष्ट झाल्या.
राजवैभव आणि राष्ट्रनिर्माण…
कंधारपूर सांस्कृतिक चे महत्त्व…
शिलालेख, तत्कालीन भाषा, लिपी, प्रशासन आणि समाजजीवन….
धार्मिक स्थळे, यक्षशिल्प, सांस्कृतिक कार्य आणि शिल्पकला
ह्यावर चा वेगवेगळ्या राजवटीच्या प्रभाव….
राष्ट्रकुट हे दख्खनच्या इतिहासातील अत्यंत प्रभावशाली राजघराणे होय.कृष्ण तिसरा हे विशेष पराक्रमी राजे.कंधारचा संबंध त्यांच्या कारकीर्दीशी जोडला जातो.इ.स.940-970 राष्ट्रकुटांची उपराजधानी म्हणूनही काही ठिकाणी कंधार चा उल्लेख आढळतो.राजा कृष्ण तिसरा हे केवळ पराक्रमी राजे नव्हते तर जलव्यवस्थापन, नगरविकास, राज्यशासन,उद्यान व्यवस्था, धार्मिक चळवळीत विशेष प्रभावी व्यवस्थापन त्यांनी केले.ह्याचा उल्लेख शिलालेखात आढळून येतो.डोंगराळ, खडकाळ प्रदेश असल्याने तलाव, विहीरी, पाणीपुरवठा नियोजन, मंदिरे, धार्मिक संस्थांना दिलेला राजाश्रय, समाजोपयोगी उपक्रम हे उल्लेखनीय आहे.तत्कालीन राजसत्तेचा लोकजीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन दाखवते. ह्या सर्व गोष्टींचा प्रबळ पूरावा म्हणजे " राष्ट्रकूटकालीन शिलालेख"
कंधार जवळ बहाद्दरपूरा परिसरात खासबाग विहीरीजवळ हा शिलालेख आढळून आला असे लिहिले आहे. हा शिलालेख सरकारने ऐतिहासिक संशोधन प्रकाशन मध्ये प्रकाशित केला आहे. शिलालेख संस्कृत भाषेत असून अपुर्ण आहे. ह्या शिलालेखात राजवाडा, व्यवस्थापन, यक्षद्वार, गणेशमूर्ती, लोकमंडप, पाच पाणपोयी, पाणी वितरण व्यवस्था, वेदपाठक, कवी, साहित्यिक यांच्या साठीच्या तरतूदी नमूद केल्या आहेत. विशेष म्हणजे कवी, लेखक आणि पाठक यांना आर्थिक आणि वस्तू रूपात मदत देण्याचा उल्लेख केला आहे.कला, साहित्य, धर्म, संस्कृति, विद्वत्ता ह्याला "राजाश्रय" होता हा निष्कर्ष ह्या वरून आपल्याला काढता येईल.
एकुणच कंधारची भूमी ही केवळ युद्ध, सत्तासंघर्षाची भूमी नव्हती तर ज्ञान, साहित्य, कला आणि लोककल्याण ह्याला आश्रय देणारे सांस्कृतिक केंद्र होते.
"जलव्यवस्थापनाचे अद्भुत उदाहरण कंधार च्या इतिहासात आढळून येते. "जगत्उत्तुंग समुद्र" असा उल्लेख काही ठिकाणी आढळून आला. समुद्र म्हणजे विशाल जलाशय ह्या अर्थाने वापरला असावा. त्या काळात पाण्याचे नियोजन ही महत्त्वाची गोष्ट मानली जात असे. शेतीला पाणी पुरवणे, नगराला पाणी पुरवणे, नागरिकांच्या गरजा भागवण्यासाठी पाण्याची साठवणूक, जलव्यवस्थापन करणे हे कर्तव्य भावनेने केले जात होते असे दिसते. आज आपण जलसंवर्धन, पाण्याचे नियोजन आणि शाश्वत विकास ह्या विषयावर चर्चा करतो. परंतू शतकांपूर्वी कंधार मध्ये अशा प्रकारे सार्वजनिक जलव्यवस्थेचे नियोजन केले जात असे. अभिमानास्पद गोष्ट आहे ही.
विशाल यक्षशिल्प हे शिल्पकलेच्या बाबत सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घडवतो. ६० फुट उंच अशा शिल्पाचे अवशेष किल्लात आहेत.यक्ष देवतेचा निसर्ग, संपत्ती, भूमी, आणि संरक्षण यांच्या सोबत संबंध पूराणात लिहीला आहे. तत्कालीन कलाकारांची कल्पकता आणि तांत्रिक क्षमता ह्या शिल्पावरून लक्षात येते. कंधार वर वेगवेगळ्या राजसत्तांनी राज्य केले. त्या सर्व राजवटीचा प्रभाव कमीअधिक दिसतो.. राष्ट्रकुटांनंतर निजामशाही आली. निजामाच्या ताब्यात हा किल्ला गेला.काही सुधारणा निजामाने पण केल्या.आजच्या घडीला हा किल्ला कोणाचा हा वाद सुरु आहे. यात न पडता मराठवाड्याचे वैभवशाली सांस्कृतिक वैभव असणाऱ्या किल्ल्याचे संवर्धन व्हायला हवे.

