Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मातृमंदिर विश्वस्त संस्थेतर्फे पुरस्कारासाठी संतवाङ्मयावरील पुस्तके पाठविण्याचे आवाहन

मातृमंदिर विश्वस्त संस्थेतर्फे पुरस्कारासाठी संतवाङ्मयावरील पुस्तके पाठविण्याचे आवाहन

पुणे : ॥ ॐ ॥ मातृमंदिर विश्वस्त संस्था आणि ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय, निगडी यांच्या वतीने संत वाङ्मयाच्या अभ्यासाला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी दिला जाणारा संत वाङ्मय पुरस्कार यंदाही देण्यात येणार आहे.

संत साहित्यावरील लेखनाला प्रोत्साहन मिळावे तसेच लेखक, प्रकाशक आणि वाचक यांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने ही योजना राबवली जाते.

संस्थेतर्फे शालेय विद्यार्थी व अध्यापकांना संत वाङ्मयाचा अभ्यास करण्यासाठी अधिकाधिक साहित्य उपलब्ध व्हावे, तसेच संत परंपरेवरील लेखनाला चालना मिळावी, या हेतूने हा पुरस्कार दिला जातो. पुरस्कार वितरण समारंभ मातृमंदिर वर्धापन दिनानिमित्त सौर १ मार्गशीर्ष (२२ नोव्हेंबर) रोजी ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय, निगडी (पुणे) येथे आयोजित करण्यात येणार आहे.

पुरस्कारासाठी मागील दोन वर्षामध्ये प्रकाशित झालेल्या संतविषयक मराठी पुस्तकांचा विचार केला जाणार असून चालू वर्षातील प्रकाशनांचा समावेश केला जाणार नाही. संत साहित्याचे परीक्षण ( टीका, विवेचन ) संतचरित्रे, संताच्या कार्यावरील विवेचनात्मक लेखन, संत जीवनावर आधारित ललित साहित्य (कथा, कादंबरी, काव्यकोश इत्यादी सर्व प्रकारचे साहित्य) पुरस्कारासाठी पाठविण्यात यावे.

१०० पेक्षा अधिक पृष्ठांच्या दोन उत्कृष्ट पुस्तकांना अनुक्रमे रु. ८,००० आणि रु. ६,००० असे दोन पुरस्कार दिले जाणार आहेत. या पुरस्काराच्या रकमेपैकी ६० टक्के रक्कम लेखकाला तर ४० टक्के रक्कम प्रकाशकाला दिली जाईल. तसेच १०० पृष्ठांपर्यंतच्या बालसाहित्य प्रकारातील संतकथा, संतचरित्र किंवा संतवचनसंग्रह अशा स्वरूपातील दोन पुस्तकांना प्रत्येकी रु. २,००० चे पुरस्कार दिले जातील. पुरस्कारासाठी आलेल्या पुस्तकांचे परीक्षण संतसाहित्य क्षेत्रातील तीन ख्यातनाम तज्ज्ञांच्या समितीमार्फत करण्यात येईल आणि त्यानंतर पुरस्कारपात्र पुस्तकांची निवड केली जाईल.

लेखक व प्रकाशकांनी पुरस्कारासाठी प्रत्येक पुस्तकाच्या दोन प्रती सौर २४ श्रावण (९ ऑगस्ट) पर्यंत मातृमंदिर विश्वस्त संस्था, ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय, पेठ क्र. २५, निगडी, पुणे - ४११०४४ या पत्त्यावर पाठवाव्यात. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी दूरध्वनी : ०२०-२७१६८००० / ७४९९७२०३९३ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन स्पर्धा प्रमुख सु. मा. कुलकर्णी यांनी केले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Iye Marathichiye Nagari