Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांचा समृद्ध प्रवास उलगडणारे 'संवाद भूषण' Sanwad Bhushan Book Review

प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांचा समृद्ध प्रवास उलगडणारे 'संवाद भूषण' Sanwad Bhushan Book Review

पुस्तक परिचय

प्रसारमाध्यमांच्या क्षेत्रात चार दशकांहून अधिक काळ विविध मान्यवरांशी आलेल्या स्नेहसंबंधांतून निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी साकारलेले 'संवाद भूषण' हे पुस्तक केवळ व्यक्तिचित्रांचा संग्रह नसून संघर्ष, जिद्द आणि समाजाभिमुख कार्याची प्रेरणादायी गाथा आहे.
विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ३४ व्यक्तिमत्त्वांच्या यशकथा वाचकांसमोर मांडत हे पुस्तक माध्यमविश्वाचे अंतरंग आणि जीवनमूल्यांची समृद्ध परंपरा उलगडून दाखवते.

शेषराव वानखेडे, ज्येष्ठ पत्रकार.
98694 84800

अनेक जण विविध प्रकारच्या प्रसार माध्यमांतून, तर कधी समक्ष समाजाशी संवाद साधून जनजागृती करीत असतात. निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी त्यांच्या 'संवाद भूषण' या पुस्तकात अशा ३४ व्यक्तींच्या कार्याचा आढावा घेतला. ज्यांनी अनेक खस्ता खात, कडू- गोड अनुभव घेत आपले आणि आपल्या बरोबर इतरांचेही जीवन समृद्ध केले आहे.

केवळ ओळखीचा आहे म्हणून त्याच्याबद्दल लिहिणे नव्हे; तर त्याचे वेगळेपण काय आहे? प्रतिकूल परिस्थितीवर त्याने कशी मात केली, समाजाला त्याचा काय उपयोग झाला आणि होत आहे ? आजच्या युवकांना त्यांच्याकडून काही प्रेरणा मिळू शकते का ? आदी बाबींचा बारकाईने विचार करूनच त्या त्या व्यक्तिंना या पुस्तकात स्थान देण्यात आले आहे.

लेखकाने मी का लिहितो, माझ्या लिखाणाचे स्वरूप काय ? माझ्या लिखाणाचा वाचकांना, समाजाला काही उपयोग होतो का ? याबद्दलची भूमिका पुस्तकाच्या मनोगतात मांडली आहे. ते म्हणतात, "ज्या परिस्थितीत माझे बालपण, तरुणपण गेले त्या परिस्थितीचा माझ्या मनावर खोल परिणाम झाला. बिकट अशा आर्थिक , कौटुंबिक, भावनिक परिस्थितीचा मनावर होत गेलेला परिणाम त्यामुळे येत गेलेले नैराश्य, वैफल्य, ज्यांच्याकडून अपेक्षा होत्या त्यांच्याकडून झालेला अपेक्षाभंग आदींमुळे स्वतःची स्वतःला वाट शोधत रहावी लागली. यातूनच "माणसाच्या परिस्थितीपेक्षा त्याची मनःस्थिती महत्वाची असते" हे उमगले. म्हणूनच प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यशस्वी झालेल्या आणि इतरांनाही यशस्वी होण्यासाठी मदतीचा हात देणाऱ्या व्यक्तींच्या प्रेरणादायी जीवनकथा लिहिण्याचा मी प्रयत्न करीत असतो ".

"संवाद भूषण" या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे लेखक जेव्हापासून म्हणजे 1983 सालापासून पत्रकारितेत आले तेव्हापासुन ज्या ज्या व्यक्तींशी त्यांचा परिचय होत गेला त्या त्या क्रमवारीने या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. त्या नुसार नगर येथील छायाचित्रकार अनिल शाह, पुणे विद्यापीठाच्या रानडे इन्स्टिट्यूटच्या वृत्तपत्र विद्या विभागातील वर्गमित्र विचारवंत- लेखक प्रा. डॉ. बाबासाहेब काझी, दूरदर्शनचे निवृत्त संचालक अशोक डुंबरे, निर्माते राम खाकाळ, निवेदिका शिबानी जोशी, कॅमेरामन नरसिंग पोतकंठी, जनमित्र विलास सरोदे, भारतीय माहिती सेवेतील निवृत्त वरीष्ठ अधिकारी सर्वश्री नितीन केळकर, मधुसूदन आडे, ज्येष्ठ पत्रकार कुमार कदम, मुख्यमंत्र्यांच्या निवृत्त जनसंपर्क अधिकारी वीणा गावडे, नवी मुंबईतील साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सुभाष कुलकर्णी, पत्रकार सर्वश्री राजेंद्र घरत, खंडुराज गायकवाड, नारायण जाधव, नवी मुंबई महापालिकाचे जनसंपर्क अधिकारी तथा निवेदक, कवी, लेखक महेंद्र कोंडे, माध्यमकर्मी सर्वश्री डॉ. बबन जोगदंड, सी. के. सुब्रह्मण्यम, प्रवचनकार संध्याताई अमृते, मिशन आयएएस अकादमीचे संचालक , लेखक- प्रभावी वक्ते, प्रा.डॉ. नरेशचंद्र काठोळे, दूरचित्रवाणी पत्रकार मनोज भोयर, संपादक वैशाली आहेर, लेखिका - प्रकाशिका लता गुठे, लेखक प्रा. डॉ. सतीश शिरसाठ, आनंदयात्री मदन लाठी, संपादक मारुती विश्वासराव, पत्रकार किरण बोळे, कवी अशोक बागवे, हास्य कवी अशोक नायगावकर, प्रभावी वक्ते प्रा. साईप्रसाद कुंभकर्ण, गायक- संगीतकार मधुकर घोडविंदे, अष्टपैलू कांचन कंदले आणि बालकांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून छत्रपती संभाजीनगर येथे वाचनालये उभारणारी मरियम मिर्झा आदींच्या प्रेरणादायी यशकथा या पुस्तकात आहेत.

या पुस्तकाची निर्मिती ' ग्रंथाली ' ने तर प्रकाशनन्यूज स्टोरी टुडे ने केले आहे. प्रसार माध्यमांमध्ये काम करण्याची इच्छा बाळगणाऱ्या तरुण तरुणींनी तर हे पुस्तक अवश्य वाचलेच पाहिजे पण माध्यमांचे अंतरंगाविषयी उत्सुकता असणार्‍या वाचकांनी देखील हे पुस्तक वाचलेच पाहिजे असे आहे.

पुस्तकाचे नाव - संवाद भुषण
लेखक - देवेंद्र भुजबळ
प्रकाशन - न्यूज स्टोरी टुडे
किंमत - ३५० रुपये

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Iye Marathichiye Nagari