Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
राजारामबापू पाटील ललित कला अकादमीचे राष्ट्रीय पुरस्कार २०२६ जाहीर

राजारामबापू पाटील ललित कला अकादमीचे राष्ट्रीय पुरस्कार २०२६ जाहीर

डॉ. सुनीलकुमार लवटे, सिसिलिया कार्व्हालो, विवेकानंद गोपाल, सुरेंद्र दरेकर, रणधीर शिंदे, अनंत कदम यांचा समावेश

ईश्वरपूर - राज्याचे माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखालीं कार्यरत असलेल्या राजारामबापू पाटील ललित कला अकादमी (महाराष्ट्र राज्य) या संस्थेच्यावतीने स्वर्गीय बापूंच्या स्मृतिप्रित्यर्थ राष्ट्रीय पातळीवर देण्यात येणारे 'लोकनेते राजारामबापू पाटील राष्ट्रीय ललित कला सन्मान २०२६' पुरस्काराची घोषणा अकादमीचे निमंत्रक कवी प्रा. प्रदीप पाटील व ज्येष्ठ सदस्य, कासेगाव शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य आर. डी. सावंत यांनी बेळगाव येथे पत्रकार परिषदेत केली.

साहित्य क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर दिलेल्या महत्वपूर्ण योगदानाकरिता प्रसिद्ध लेखक,अनुवादक मराठी व हिंदी साहित्याचे अभ्यासक डॉ. सुनीलकुमार लवटे (कोल्हापूर) यांना लोकनेते राजारामबापू पाटील राष्ट्रीय ललित कला जीवन गौरव सन्मान पुरस्कार देण्यात येणार आहे. १ लाख रुपये व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

'लोकनेते राजारामबापू पाटील राष्ट्रीय ललित कला सन्मान' पुरस्कार मराठी कविता व ललित लेखनातील योगदानाकरिता प्रसिद्ध कवयित्री व लेखिका सिसिलिया कार्व्हालो (वसई), दक्षिण भारतातील मराठी भाषेच्या अभ्यासपूर्ण योगदानाकरिता प्रसिद्ध संशोधक डॉ. विवेकानंद गोपाल (तंजावर, तामिळनाडू), कथासाहित्यातील योगदानाकरिता प्रसिद्ध कथाकार व कादंबरीकार डॉ.सुरेंद्र दरेकर (अहिल्यानगर), समकालीन मराठी समीक्षेतील योगदानाकरिता प्रसिद्ध समीक्षक प्रा.डॉ. रणधीर शिंदे (शिवाजी विद्यापीठ) यांची निवड करण्यात आली आहे. प्रत्येकी २५ हजार रुपये व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 'लोकनेते राजारामबापू पाटील राष्ट्रीय ललित कला विशेष सन्मान' पुरस्कार लेखन व मराठी भाषेच्या प्रसाराकरिता अनंत कदम (होळसमुद्र, कर्नाटक) यांना देण्यात येणार आहे. १५ हजार रुपये व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. प्रसिद्ध विचारवंत व संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्या निवड समितीने या सन्मान पुरस्कारांची निवड केली.

राजारामबापू पाटील ललित कला अकादमी आणि शब्दगंध कवी मंडळ संघ, बेळगाव यांच्यावतीने १६ मे रोजी सायं. ५.०० वाजता बेळगाव येथे आयोजित केलेल्या समारंभामध्ये अकादमीचे मार्गदर्शक माजी मंत्री, आमदार जयंतराव पाटील आणि प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हे सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. हा समारंभ श्री तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन बेळगाव येथे होणार आहे. सन्मान पुरस्कारांचे हे चौथे वर्ष आहे. यापूर्वी पुणे, बडोदा, गोवा येथे पुरस्कार वितरण समारंभ झाले आहेत.

आपल्या रचनात्मक कार्याने शिक्षण, सहकार, कृषी, उद्योग अशा विविध क्षेत्रांचा विकास करून् महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये मोलाचे योगदान दिलेल्या स्व. राजारामबापू पाटील यांच्या विचारांची जोपासणा व प्रसार राष्ट्रीय पातळीवर करण्याची भूमिका राजारामबापू पाटील ललित कला अकादमीची आहे. स्व. बापूंच्या ध्यासपूर्ण जीवनातून प्रतिभावंतांना निर्मितीच्या वेगळ्या वाटा उलगडत जाव्यात, या उदात्त हेतूने राजारामबापू पाटील ललित कला अकादमीच्यावतीने ललित कलांमधील व लोककलेतील प्रतिभावंतांचे योगदान विचारात घेऊन प्रतिवर्षी सन्मान पुरस्कार दिले जातात.

सांगली जि. प. चे माजी अध्यक्ष देवराज पाटील, उद्योजक सुरेंद्र पाटील, स्वीय सहाय्यक मोहन चव्हाण, कारखान्याचे संचालक अतुल पाटील, डॉ. संजय करंदीकर (बडोदा), डॉ. हेमंत अय्या (गोवा), डॉ. नम्रता बागडे (हैदराबाद), मोहन रेडगावकर (इंदूर), डॉ. हरमनसिंग सियान (पंजाब), प्रकाश जडे (मंगळवेढा), उद्योजक सतीश पाटील, सुनिल चव्हाण, विश्वनाथ पाटसुते, पुरुषोत्तम जोशी, डॉ.अनिल मडके यांच्यासह महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील मान्यवरांचा अकादमीमध्ये समावेश आहे.

शब्दगंध कवी मंडळ संघाचे अध्यक्ष प्रा. अशोक आलगोंडी, उपाध्यक्ष बसवंत शहापूरकर, सचिव सुधाकर गावडे, राजारामबापू पाटील ललित कला अकादमीचे सदस्य कवी वसंत पाटील, मनीषा पाटील, प्रा. कृष्णा मंडले, सुभाष कवडे, सुरेश आडके आदी सदस्य संयोजन समितीमध्ये कार्यरत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Iye Marathichiye Nagari