Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सकस जीवनानुभवांची चित्रपेर : 'जारवा'

सकस जीवनानुभवांची चित्रपेर : 'जारवा'

मातीच्या गंधाशी, शेतीच्या कष्टाशी आणि जगण्याच्या निखळ संवेदनांशी नाळ जोडणारा कल्पना दुधाळ यांचा 'जारवा' हा ललित लेखसंग्रहग्रामीण जीवनाचे वास्तव नव्या जाणिवांनी उलगडतो. निसर्ग, श्रम, स्त्री-अनुभव आणि कृषीसंस्कृतीच्या हरवत चाललेल्या ओलाव्याचा शोध घेणारे हे लेखन वाचकाला अंतर्मुख करत जीवनाकडे नव्या नजरेने पाहायला भाग पाडते.

मनीषा उगले

आपण माणसे मुळातच गोष्टीवेल्हाळ; सतत गोष्टी सांगणारी किंवा ऐकणारी. भाषेचा पूल शोधण्यापूर्वीही आपल्याकडे गोष्टी होत्याच. निसर्गातून वाचलेल्या आणि जगण्यातून वेचलेल्या. या गोष्टी कधीच मरत नाहीत; त्या शेकडो-हजारो-लाखो वर्षे जिवंत राहतात. रक्तातील अंशासकट एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सांगीवांगीने त्या झिरपत राहतात. कल्पना दुधाळ यांचा 'जारवा' हा ललित लेखसंग्रह हे अशाच हिरव्याकंच गोष्टींचे समृद्ध बेट आहे. 'धग असतेच आसपास' आणि 'सिझर कर म्हणतेय माती' या कवितासंग्रहांतून आलेली त्यांची प्रखर शेतीनिष्ठा आणि जीवननिष्ठा या चिंतनातून अधिकच अनन्यतेने प्रकटली आहे. खिळवून ठेवणाऱ्या चोवीस लेखांची ही 'पात' कल्पना दुधाळ यांनी वाचकांच्या हाती सोपवली आहे.

'जारवा' म्हणजे रोपाच्या तंतुमुळांचा पुंजका. रोपाचा जारवा जेवढा भरपूर तेवढे रोप जास्त डवरते. असा जारवा माणसाच्याही जगण्याला लगडून आलेला असतो. त्याच्या बळावर आपल्या वठण्याची वाट पाहणाऱ्या परिस्थितीवर मात करत तिला पुरून उरणारे सदाहरित जंगल होण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती 'जारवा' या संग्रहातील लेखनामागे आहे. 'तण सुखावलं की धान दुखावतं' ही लेखिकेची जाण फक्त पीकपाण्यापुरती मर्यादित नाही, जगण्याकडेही ती तितक्याच उमजतेपणाने पाहते. या लेखिकेला तिच्या शेतशिवाराची नाडी एखाद्या अनुभवी वैद्यासारखी अचूक सापडली आहे. ती झाडावेलींशी बोलते; गुरावासरांना आणि किड्या-मुंग्यांना साद घालते. वेलींवर लागलेल्या कोवळ्या काकड्या-भोपळ्यांना 'शिस्तीत वाढायचं हं,' म्हणत मायेने दटावते. तिला रानाची भाषा समजते आणि रानाला तिची. या शब्दवेड्या आणि वावरवेड्या लेखिकेचे निसर्गवाचन किती सखोल आणि सूक्ष्म आहे, याचा प्रत्यय हे पुस्तक वाचताना जागोजागी येत राहतो.

जागतिकीकरणानंतर माणसाचे भौतिक जगणे अधिक सुखाचे झाले असले तरी त्याच्या संवेदनांना मात्र भिरुड लागताना दिसतो आहे. अशा सावलीपारख्या काळात माणसाची मातीशी तुटलेली नाळ जोडण्याचे काम लेखक करत असतो. 'जारवा'मधून कल्पना दुधाळ यांनी अशा पायपोळीच्या जगण्यातील ओलाव्याच्या जागा पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न केला आहे. हा लेखसंग्रह म्हणजे हरवत चाललेल्या कृषी-संस्कृतीचा समाजशास्त्रीय शोध आहे. कल्पना दुधाळ यांचे हे लेखन प्रस्थापित ललितलेखनाच्या चौकटी ओलांडून एक नवा सांस्कृतिक भूप्रदेश व्यापताना दिसते. या संग्रहातील लेखांची 'रानभास', 'पायगुताडा', 'तणमोड', 'वाफसा' किंवा 'काटेपालवी' यांसारखी शीर्षकेच मुळी बदलत्या पर्यावरणाची साक्ष देणारे पुरावे आहेत.

भारत देशातील उपजत भूसंपदा आजारी पडण्याच्या उंबरठ्यावर का येऊन ठेपल्या आहेत ?

ग्रामीण जीवनाचे एक प्रकारचे 'रोमँटिक' चित्र बऱ्याच कवी-लेखकांनी उभे केले आहे, पण ही लेखिका निसर्गाचे असे रोमँटिकीकरण नाकारते. ती शेतीतील अपार कष्ट, धावपळीचे जगणे आणि हाती शून्य ठेवणाऱ्या अर्थव्यवस्थेचा हिशोब निर्भीडपणे मांडते. ती म्हणते, 'लोक लिहितात की शेतात मजा असते… पण इथे कामाचा किती घायटा असतो!' शेती करणे म्हणजे स्वतःचे शेपूट पकडण्यासाठी मांजराने स्वतःभोवती गोल फिरण्यासारखे आहे, असे अस्वस्थ निरीक्षण ती नोंदवते.
तिच्या लेखनातील स्त्री-जाणिवा प्रगल्भ आहेत. आपल्या भवतालातील अन्याय्य आणि विषम परिस्थितीची तिला जाणीव आहे. त्याबद्दलची खंत आणि निषेधही ती व्यक्त करते; पण या साऱ्यातून जिद्दीने पार पडले पाहिजे, असा समंजस सूरही लावायला ती विसरत नाही. प्रादेशिक जाणिवांचे वजन असलेली चपळ भाषा, लोकभाषेतल्या अनवट म्हणी, वाक्प्रचार आणि लोकगीतांचे वैभव हे या लेखसंग्रहाचे नवे संचित आहे.

'काळाचा तुकडा उन्हात वाळत घातल्यासारखी उन्हं' किंवा 'जेवढा कडक उन्हाळा, तेवढ्याच मायाळू सावल्या' अशा चित्रदर्शी, प्रत्ययकारी प्रतिमा ही या संग्रहाची ताकद आहे. 'चकचकीत चित्रांना तळपत्या उन्हातल्या पायपोळीच्या गोष्टी कशा सांगायच्या?' असे कळकळीचे सवाल ही लेखिका अभिजन संस्कृतीला विचारताना दिसते. जगण्यातल्या चढ-उतारांच्या नोंदी घेत असली, तरी ती निराशावादी नाही. पडण्यातून सावरून पुनःपुन्हा उठण्याची उमेद तिच्या लेखनात आहे. ती प्रयत्नवादी आहे. कोरोनासारख्या संकटातही तिची नजर साखरेचा कण ओढणाऱ्या मुंगीकडे जाते. तणमोडीच्या जिद्दीतून मानवी जगण्याचे प्रयोजन शोधणारा हा 'जारवा' म्हणजे रखरखीच्या जगण्यातले एक थंडगार विसाव्याचे ठिकाण आहे. उत्तम ललितलेखन अनुभवण्याचा आनंद देणारे आणि वाचता वाचता अंतर्मुख करणारे हे बरवे लेखन पुन्हा पुन्हा वाचावे असेच आहे.

पुस्तकाचे नावः जारवा (ललित लेखसंग्रह)
लेखिकाः कल्पना दुधाळ
प्रकाशकःशब्द पब्लिकेशन
पृष्ठे : १८३
किंमत: ३३०
पुस्तकासाठी संपर्क ः 98201 47284

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Iye Marathichiye Nagari