Dailyhunt
उकिरड्यातून उगवलेले माणूसपण : 'भंगार'ची विदारक कहाणी

उकिरड्यातून उगवलेले माणूसपण : 'भंगार'ची विदारक कहाणी

पल्या माणूसपणाचे, आपल्या विकासाचे, आपल्या विचारबुद्दीचे कोणीतरी जबर लचके तोडून ते उकिरड्यात टाकल्याने आपलीच गणना भंगारात होते की काय असे अशोक जाधव यांची 'भंगार' ही कादंबरी वाचताना वाटत राहते.

अंग चोरुन घेऊन 'भंगार' वाचण्याची वेळ येण्याचं कारण म्हणजे 'भंगारा'तील विदारक अनुभव वेचवत नाहीत. सोसवत नाहीत.

अश्विनी फटांगरे

माणसांच्या पलिकडेही माणूस ना‍वाचे काही जीव असतात. पत्रा, लोखंड, प्लास्टिक यासारख्या फेकून दिलेल्या वस्तू गोळा करुन, विकून पोट भरणं, माणसांच्या उष्ट्यामाष्ट्यावर, त्यांनी फेकलेल्या तुकड्यावर जगणारीही एक माणूस नावाची तुकडी राहते, तिला गोसावी म्हणतात. ही तुकडी निसर्गानं मानवाच्या गटात जन्माला घातली म्हणून ही मानवाची भटकी जमात; पण मानवी मनातील जातीभेदामुळे दारिद्र्यामुळे ती मानव नसल्यातच जमा होते. अशा गोसावी जमातीची व्यथा सांगणारी ही आत्मचरित्रपर कादंबरी आहे.

बुरशी आलेल्या, कुत्र्यानं तोंडातून टाकलेल्या, कसल्याही शिळ्या पाक्या भाकरीच्या तुकड्यावर जगणारी ही माणसं फक्त पोटासाठी इतके हाल हाल होऊन जगतातच तर आरोग्य, शिक्षण इ. या मुलभूत गरजाही या लोकांसाठी खूप लांबच्या असतात. शिक्षणासोबतच आरोग्याचं भान नसल्यामुळे ते मरणयातना भोगत आपलं आयुष्य जगत असतात. जातपंचायतीला सर्वस्व मानणारी ही माणसं, माणूसपणाच्या खूणा विसरुन नको ते जीणं जगण्याची त्यांच्यावर वेळ येते. देशाचा विकास होत जातो. जागतिकीकरणात अनेक गोष्टींचे शोध लागून जग मुठीत येते. तरीही हे दुर्लक्षित मुठभर लोक सोयी-सुविधेपासून वंचित राहत असतात. या लोकांच्या भंगारावस्थेला हा वंचितपणा अधिक खोल करतो.

अशाही परिस्थितीत लेखक शिकतो. बिकट परिस्थितीत शिक्षणाची आस धरल्याने लेखक शिक्षक होतो. लेखकाचं घडणं, तो घडताना येणारे कल्पनातीत अनुभव, जातपंचायतीचे कठोर नियम, जातीतीलच विरोधक, अशिक्षित स्त्रिया, स्त्रियांवर अवलंबून असणारे पूर्ण कुटूंब, दिवसरात्र उकिरडे फुंकून शेवटी पुरुषजातीची दादागिरी, स्त्रियांवर लादले जाणारे जातपंचायतीचे अमानवी नियम, ते नियम शिरावर घेऊन जगायची येणारी हतबलता. जातीबाहेरच्या समाजानं भंगारात टाकल्यामुळं स्वत:च्या सामाजाविरुद्ध ब्र ही न काढता येणारी अगतिकता, या अगतिकतेत 'धारुच्यो' व 'उभायत' या जातपरंपरांना द्यावं लागणारं तोंड, त्यातून तिची होणारी आत्यंतिक घुसमट. यासारख्या अनेक जीवनवेदना मांडताना लेखक अशाही परिस्थितीत अनेक स्त्रियांना, पुरुषांना शिक्षित करतो. जातपंचायतीविरुद्ध आवाज ऊठवून त्या बंद करण्याचा प्रयत्न करतो.

मानवाच्या 'भंगार' परिस्थितीत बदल करणं तेवढं सोपं नाही हे कादंबरी वाचताना वाचकाच्या लक्षात येतं. यातील अंगावर काटा आणणारे प्रसंगानुभव वाचकाची उत्सुकता वाढवतात. स्वत: शिक्षित होऊन सोबत समाजाचाही उद्धार करता येतो हे समाजभान ही कादंबरी वाचकापर्यंत पोहचवते. कादंबरीची भाषा सरळ, सोपी आहे. ही छोटेखानी आत्मचरित्रपर कादंबरी वाचकास प्रेरणादायी ठरेल असा तिचा अंगचा आशय आहे.

भयचकित करणारा संघर्ष…". भंगार "

स्वतावर ओढवलेल्या संकटातून मार्ग काढत गोसावी समाजातील शिक्षक झालेल्या इचलकरंजी येथील अशोक जाधव या कार्यकर्त्याचे मनोविकास प्रकाशनाने प्रसिद्ध केलेले "भंगार " हे आत्मकथन वाचनात आले. एका बैठकीत वाचून काढलेलं अलिकडच्या काळातील हे पहिले पुस्तक. आईच्या मागून भंगार वेचायेला बाहेर पडलेला अजान मुलगा… पाचवीला पूजलेली भूक हे त्याचं भयानक वास्तव. गडीमाणसांनी व्यसनात दंग राहून बायांनी तिन्ही त्रिकाळ भंगार गोळा करावं… उकिरडा हेच त्यांचे घर…हागंदारीत थाटलेला संसार.
रोजच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी भंगारवाल्याकडे भंगार विकून या बाया कसंबसं आयुष्य रेटतात… या सर्व पार्श्वभूमीवर लेखकाला शिकण्याची निकड जाणवते आणि सुरू होतो परस्थितीशी संघर्ष…
हा संघर्ष लेखकाचा स्वताशी होतो. कुटुंबातल्या अडाणी आई-बाबाशी होतो.
भीक आपल्यालाच मिळावी म्हणून डुक्कर, कुत्री आणि दोस्तांशीही होतों…
हा संघर्ष गोसावी समाजातील अमानवी ,अन्यायी रुढी परंपरांशीही होतो.
संघर्ष जीवघेणा होतो.. पावलापावलावर…
समाजाच्या अभेद्य जातपंचायतीशी संघर्ष होतो…
शोषणाचे हत्यार बनलेल्या भंगार व्यापाऱ्यांशी होतो…
गोसावी समाजातील महिलांच्या हाल अपेष्टांना पारावार नाही.. त्यांना माणूस म्हणून जगता यावे यासाठी हा संघर्ष आहे…
लोकशाहीतील मतांचं राजकारण करणाऱ्या पुढाऱ्यांविरूद्धचा संघर्ष….
शिक्षण हाच मुक्तीचा एकमेव मार्ग आहे हे माहीत झालेल्या लेखकाने बिकट परिस्थितीतून मार्ग काढत.. शिक्षण घेत.. समाजातील मुलामुलींचे शिक्षण… समाजातील वाईट प्रथांच्या उच्चाटनासाठी मेळावे..मोर्चे अशा प्रबोधनाच्या धडपडी पानापानांत भेटतात…
एकविसाव्या शतकातही गोसावी समाजात किती भयंकर चालिरिती आहेत हे वाचून आपण सुन्न होऊन जातो.. मात्र या सगळ्या उकिरड्यातून समाज बाहेर पडावा म्हणून लेखकाचे प्रयत्न पाहून भयचकितही होतो… आपल्या मर्यादित कुवतीनुसार त्याने दिलेल्या लढ्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.

रवींद्र गुरव

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Iye Marathichiye Nagari