Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
या पंधरवड्यामध्ये करावे शेतामधील मातीचे परीक्षण

या पंधरवड्यामध्ये करावे शेतामधील मातीचे परीक्षण

शेतीतील भरघोस उत्पादनाचा पाया जमिनीच्या सुपीकतेवर अवलंबून असतो. मात्र अनेकदा योग्य माती परीक्षण न करता खतांचा अतिरेक केल्याने उत्पादन खर्च वाढतो आणि जमिनीची गुणवत्ता खालावते. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर या पंधरवड्यात शेतजमिनीतील मातीचे परीक्षण करून तिच्या अन्नद्रव्यांची, सामू, क्षारता आणि सेंद्रिय कर्बाची माहिती जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

योग्य माती परीक्षणामुळे खत व्यवस्थापन सुलभ होऊन उत्पादनक्षमता वाढण्यास मोठी मदत होते.

डॉ. अतिश पाटील,
विषय विशेषज्ञ, मृद विज्ञान, केव्हीके, धुळे

शेतजमिनीतील मातीच्या भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्मांची प्रयोगशाळेत तपासणी करणे म्हणजे माती परीक्षण होय. जमिनीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण, सामू, क्षारता, सेंद्रिय कर्ब व चुनखडीचे प्रमाण समजून घेणे पीक उत्पादन वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. माती परीक्षण केल्याने जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण समजते. पिकांच्या गरजेनुसार खत मात्रा ठरवता येते. खतांची बचत होऊन कार्यक्षमता वाढते. खतांवरील अनावश्यक खर्च टळतो. समस्याग्रस्त जमिनीची सुधारणा करता येते. जमिनीच्या गुणधर्मांनुसार योग्य पिकांची निवड करता येते. जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता वाढवण्यास मदत होते.

माती नमुना घेण्याची योग्य पद्धत :

उन्हाळ्यात (खरीप पेरणीपूर्वी ) माती परीक्षण करणे सर्वोत्तम आहे. एक एकर क्षेत्रातून ८-१० ठिकाणी इंग्रजी 'झिगझॅग' पद्धतीने फिरून साधारण ३० सेंमी खोलीवरून मातीचे नमुने घ्यावेत. सर्व नमुने एकत्र करून त्यातून सर्वसमावेशक १ किलो नमुना कापडी पिशवीत भरून त्यावर पुढील हंगामातील पिकांचा उल्लेख करून तपासणीसाठी पाठवावा.

नमुना गोळा करताना काय टाळावे :

शेतातील विहीर, बांध, झाड, पायवाट, गुरांचा गोठा, मळणी केलेली जागा, शेणखत ठेवलेल्या व रासायनिक खते दिलेल्या जागेवरून नमुना घेऊ नये. तसेच वेगवेगळ्या रंगाची माती एकत्र करू नये.

मृदा आरोग्य पत्रिका :

कृषी विज्ञान केंद्र, कृषी महाविद्यालय किंवा कृषी विभाग प्रयोगशाळेतून मातीचे परीक्षण किमान दोन वर्षांतून एकदा करून त्यानुसार स्वतःच्या शेताची मृदा आरोग्यपत्रिका तयार करणे फायदेशीर ठरते.

शेतीविषयक माहितीसाठी व्हॉट्सअॅप क्रमांक - 9340061710

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Iye Marathichiye Nagari