मुंबई. लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने एक धमकीचा संदेश ऑनलाइन समोर आल्यानंतर अभिनेता आमिर खानची सुरक्षा वाढवण्यात आल्याचे वृत्त आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, मुंबई पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून अभिनेत्याच्या निवासस्थानाच्या परिसरात दक्षता वाढवली असून, त्याच्या सुरक्षा व्यवस्थेचाही आढावा घेतला जात आहे.
आमिर खानची सुरक्षा व्यवस्था कडक -
टाइम्स नाऊच्या वृत्तानुसार, ही धमकी एका सोशल मीडिया संदेशातून आली होती, ज्यामध्ये आरझू बिश्नोई नावाने ओळख सांगणाऱ्या आणि लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंध असल्याचा दावा करणाऱ्या एका व्यक्तीने अभिनेत्याला लक्ष्य केले होते. ही पोस्ट समोर आल्यानंतर, महाराष्ट्राचे केंद्रीय गृह (शहरी) राज्यमंत्री योगेश रामदास कदम यांनी सांगितले की, पोलिसांनी या प्रकरणाची स्वतःहून दखल घेतली असून ते परिस्थितीचा आढावा घेत आहेत. त्यांनी पुढे सांगितले की, आमिरच्या सध्याच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला जाईल आणि गरज भासल्यास ती अधिक मजबूत केली जाईल.
अहवालानुसार, खबरदारीचा उपाय म्हणून अभिनेत्याच्या मुंबईतील निवासस्थानाच्या परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे, तर दुसरीकडे पलिसांकडून धमकी संदेशाच्या स्रोताचा तपास केला जात आहे.
संदेशात काय म्हटले होते
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या पोस्टमध्ये, आमिर खानच्या गौरी स्प्रॅटसोबतच्या नुकत्याच झालेल्या लग्नाचा संदर्भ देण्यात आला होता आणि अभिनेत्यावर "लव्ह जिहाद"ला प्रोत्साहन दिल्याचा आरोप करण्यात आला होता, असे वृत्त आहे. तो एक "अंतिम इशारा" असल्याचा दावा त्या संदेशात करण्यात आला होता आणि परिणाम भोगण्यास तयार रहा, अशी धमकी देण्यात आली होती. यानंतर पोलीस खाते सतर्क झाले आहे.
आयएएनएसच्या वृत्तानुसार, पंजाब पोलिसांनी आरजू बिश्नोईचा सहभाग निश्चित केला आहे, ज्याने पोस्टमध्ये स्वतःची ओळख लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य म्हणून दिली असल्याचे म्हटले जाते. पोलिसांनी सुरू असलेल्या तपासाबाबत अधिक तपशील अद्याप सार्वजनिकरित्या उघड केलेला नाही.
दरम्यान आमिर खान किंवा त्यांच्या टीमने या धमकीवर सार्वजनिकरित्या कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान, पोलीस आपला तपास सुरू ठेवत आहेत, तसेच अभिनेत्याच्या सभोवतालची सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.
5 जुलै 2026 मध्ये आमिरने मुंबईतील त्याच्या निवासस्थानी एका खाजगी समारंभात गौरी स्प्रॅटसोबत लग्न केल्यानंतर काही आठवड्यांतच ही घडामोड समोर आली आहे. या लग्नाने अभिनेत्याच्या वैयक्तिक आयुष्यात एका नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. आमिरचे यापूर्वी रीना दत्तासोबत लग्न झाले होते, ज्यांच्यापासून त्याला जुनैद आणि इरा खान ही दोन मुले आहेत. 2002 मध्ये हे जोडपे विभक्त झाले. नंतर 2005 मध्ये त्यांनी चित्रपट निर्मात्या किरण राव यांच्याशी लग्न केले आणि 2021 मध्ये दोघांनी विभक्त झाल्याची घोषणा केली, तरीही ते त्यांच्या मुलाचे सह-पालकत्व आणि व्यावसायिक सहकार्य सुरू ठेवत आहेत.
हे ही वाचा -'गजनी', 'लगान' गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते प्रदीप रावत यांचे निधन; वयाच्या 74व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

