Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Analogue Paneer: महाराष्ट्रात 'ॲनालॉग पनीर'वर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा दणका; ॲनालॉग पनीर म्हणजे नेमके काय?

Analogue Paneer: महाराष्ट्रात 'ॲनालॉग पनीर'वर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा दणका; ॲनालॉग पनीर म्हणजे नेमके काय?

Jagran Marathi 1 week ago

मुंबई - राज्यातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळावे, तसेच पनीरच्या नावाखाली होणारी ग्राहकांची फसवणूक रोखावी, यासाठी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठा निर्णय घेतला आहे.

राज्याचे अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी 'ॲनालॉग पनीर' अर्थात दुधापासून तयार न होणाऱ्या 'नॉन-डेअरी पनीर'वर वर्षभरासाठी बंदी घातली आहे. या निर्णयानुसार अशा पनीरचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि विक्री करता येणार नाही.

ही बंदी केवळ उत्पादक आणि विक्रेत्यांपुरती मर्यादित नसून हॉटेल, रेस्टॉरंट, केटरर्स, फास्ट फूड केंद्रे आणि इतर खाद्यसेवा आस्थापनांनाही लागू होणार आहे. त्यामुळे पनीरच्या पदार्थांसाठी स्वस्त पर्याय म्हणून वापरल्या जाणाऱ्या ॲनालॉग पनीरवर आता राज्यभर निर्बंध येणार आहेत.

ॲनालॉग पनीर म्हणजे नेमके काय?

सामान्य पनीर हे दुधापासून तयार केले जाते. मात्र ॲनालॉग किंवा नॉन-डेअरी पनीर हे दुधाऐवजी वनस्पतीजन्य तेल, स्टार्च, इतर घटक आणि खाद्य मिश्रणांचा वापर करून तयार केले जाऊ शकते. दिसायला आणि काही प्रमाणात चवीला ते पनीरसारखे वाटत असल्याने ग्राहकांना दोन्ही उत्पादनांमधील फरक सहज ओळखता येत नाही.

अनेक ठिकाणी अशा उत्पादनाची योग्य माहिती न देता किंवा त्याला थेट 'पनीर' म्हणून विकले जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. त्यामुळे ग्राहकांना आपण दुधापासून तयार झालेले पनीर खात आहोत की त्याचा कृत्रिम पर्याय, याची माहिती मिळत नव्हती. याच पार्श्वभूमीवर अन्नसुरक्षा विभागाने कठोर पाऊल उचलले आहे.

हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरर्सनाही वापरण्यास मनाई -

राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरिंग व्यवसायांमध्ये पनीरचे अनेक पदार्थ मोठ्या प्रमाणात विकले जातात. पनीर टिक्का, पनीर बटर मसाला, पनीर बिर्याणी, पनीर रोल, पनीर पराठा यांसारख्या पदार्थांसाठी ॲनालॉग पनीरचा वापर होण्याची शक्यता लक्षात घेऊन खाद्यसेवा आस्थापनांनाही या बंदीच्या कक्षेत आणण्यात आले आहे.

यापूर्वी अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाच्या (FSSAI) पश्चिम विभागाने 'चीज ॲनालॉग'ला 'पनीर' म्हणून विकणे हा गंभीर नियमभंग असल्याचे स्पष्ट केले होते. तसेच हॉटेल आणि रेस्टॉरंटना कच्च्या मालाची तपासणी करण्याच्या आणि ग्राहकांना योग्य माहिती देण्याच्या सूचना देण्यात आले होते.

दरम्यान महाराष्ट्रात वर्षभराची बंदी लागू झाल्याने हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरर्सना त्यांच्या पनीरच्या पुरवठ्याची अधिक काटेकोर पडताळणी करावी लागणार आहे.

ग्राहकांची फसवणूक आणि आरोग्याची चिंता

ॲनालॉग पनीर दिसायला दुधाच्या पनीरसारखे असल्याने ग्राहकांची दिशाभूल होण्याची शक्यता असते. दुधापासून तयार होणाऱ्या पनीरमध्ये प्रथिने आणि इतर पोषक घटक असतात. मात्र नॉन-डेअरी पर्यायाची पोषणमूल्ये आणि गुणवत्ता वेगळी असू शकते. अशा पदार्थांच्या निर्मितीमध्ये वापरल्या जाणाऱ्या घटकांची गुणवत्ता, उत्पादनाची पद्धत, स्वच्छता आणि योग्य लेबलिंग याबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत. ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण आणि अन्नपदार्थांबाबत पारदर्शकता राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

नियम मोडल्यास कारवाईचा इशारा

बंदी लागू असताना ॲनालॉग पनीरचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण, विक्री किंवा खाद्यपदार्थांमध्ये वापर आढळल्यास संबंधितांवर अन्नसुरक्षा कायद्यानुसार कारवाई होऊ शकते. त्यामुळे उत्पादक, वितरक, घाऊक विक्रेते, किरकोळ विक्रेते आणि खाद्यसेवा आस्थापनांनी तातडीने आपल्या साठ्याची आणि पुरवठा साखळीची तपासणी करणे आवश्यक ठरणार आहे.

अन्नसुरक्षा कायद्यातील तरतुदीनुसार सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी विशिष्ट खाद्यपदार्थावर एका वर्षापर्यंत बंदी घालण्याचा अधिकार अन्न सुरक्षा आयुक्तांना आहे.

हे ही वाचा -अक्षम्य निष्काळजीपणा.. मुंबईत काजू कतलीमध्ये आढळली गंजलेली धातूची पिन, दुकानदाराकडून तडजोडीची ऑफर?

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Jagran Marathi