जेएनएन, शिर्डी. शेतकऱ्यांची फसवणूक आणि बेकायदेशीर सावकारी प्रकरणात आरोपी असलेल्या भोंदू अशोक खरातला शिर्डी पोलिसांनी नाशिकहून ताब्यात घेत शिर्डीत आणले आहे. या कारवाईमुळे परिसरात मोठी चर्चा रंगली असून उद्या त्याला राहाता न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
अशोक खरात आणि त्याची पत्नी यांच्याविरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात शेतकऱ्यांची फसवणूक, आर्थिक गैरव्यवहार तसेच बेकायदेशीर सावकारीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तक्रारदार शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप केला असून या प्रकरणाचा तपास शिर्डी पोलीस करत आहेत.
तपासाच्या अनुषंगाने अधिक माहिती मिळवण्यासाठी आणि गुन्ह्याचे धागेदोरे उलगडण्यासाठी पोलिसांनी अशोक खरातचा ताबा घेतला आहे. चौकशीदरम्यान आर्थिक व्यवहार, संबंधित कागदपत्रे आणि अन्य व्यक्तींच्या सहभागाबाबत माहिती घेण्यात येत आहे.
आज रात्री अशोक खरातला शिर्डी पोलीसांच्या कोठडीत ठेवण्यात येणार असून उद्या सकाळी राहाता न्यायालयात हजर केले जाणार आहे. पोलिसांकडून पुढील तपासासाठी कोठडीची मागणी केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणामुळे शिर्डी आणि परिसरातील शेतकरी वर्गात संतापाचे वातावरण असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर या प्रकरणाच्या तपासाला आणखी वेग येण्याची शक्यता आहे.

