नाशिक. राज्यभरात खळबळ उडवणाऱ्या अशोक खरात प्रकरणात आता नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. एका आयएएस अधिकाऱ्यानंतर आता दोन महिला वरिष्ठ पोलीस अधिकारीही तपासाच्या कक्षेत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
माहितीनुसार, एका डीसीपी तर दुसऱ्या एसीपी दर्जाच्या अधिकारी अशोक खरातच्या संपर्कात होत्या, अशी माहिती समोर आली आहे.
पोलीस अधिकाऱ्यांनी आवडत्या पोस्टिंगसाठी खरातची मदत घेतली होती का? असा गंभीर सवाल उपस्थित होत असून, या संदर्भात आर्थिक व्यवहारही झाले होते का याचा तपास यंत्रणांकडून केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती अधिकच वाढण्याची चिन्हे आहेत.
लैंगिक शोषणाची कबुली, 'चमत्कार' नव्हे तर हातचलाखी-
दरम्यान, अशोक खरातने चौकशीत महिलांचे लैंगिक शोषण केल्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे. महिलांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी तो तथाकथित 'विज्ञान' आणि 'चमत्कार' यांचा आधार घेत असल्याचे सांगत होता. मात्र, प्रत्यक्षात हे सर्व हातचलाखीचे प्रकार असल्याचे त्याने मान्य केल्याची माहिती समोर आली आहे.
महिलांना धमकावणे, मानसिक दबाव टाकणे आणि अंधश्रद्धेचा फायदा घेत त्यांचे शोषण करणे, अशा पद्धतीने त्याने आपले जाळे निर्माण केले होते. "चमत्कार आणि वशीकरण" म्हणून दाखवले जाणारे प्रकार हे प्रत्यक्षात फसवणुकीचे तंत्र असल्याचेही तपासात स्पष्ट होत आहे.
आणखी कोण सहभागी?
या संपूर्ण प्रकरणात अशोक खरातला आणखी कोणाची मदत होती का, याचाही सखोल तपास सुरू आहे. काही प्रभावशाली व्यक्तींचा त्याला पाठिंबा होता का, यावरही चौकशी केंद्रित करण्यात आली आहे.
SIT आणि EDची नजर-
या प्रकरणाची चौकशी विशेष तपास पथक (SIT) करत असून, आर्थिक गैरव्यवहाराच्या शक्यतेमुळे अंमलबजावणी संचालनालय (ED) देखील सक्रिय झाले आहे. येत्या काही दिवसांत आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

