नवी दिल्ली. Assembly Election 2026: केरळम, (Kerala Polls) आसाम (Assam Assembly Elections) आणि पुदुचेरीमधील (Puducherry Assembly Election)सर्व विधानसभा जागांसाठी आज, गुरुवारी, मतदान होणार आहे.
या राज्यांमध्ये सकाळी 7 वाजता एकाच टप्प्यात मतदानाला सुरुवात झाली. 9 एप्रिल रोजी सकाळी आसाममधील 126, केरळमधील 140 आणि पुदुचेरीमधील 30 जागांसाठी एकाच वेळी मतदानाला सुरुवात झाली. या तीन राज्यांमधील एकूण 1,849 उमेदवारांचे भवितव्य गुरुवार संध्याकाळपर्यंत ईव्हीएममध्ये बंद होईल. निकाल 4 मे रोजी तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल राज्यांसोबत जाहीर केला जाईल.
केरळम, पदुचेरी व आसाममध्ये सकाळपासून मतदानाबाबत मतदारांमध्ये उत्साह दिसून येत आहे. सकाळपासूनच अनेक मतदान केंद्रांवर लोकांच्या रांगा लागल्याचे दिसून येत आहे. एकाच टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीत केरळमधील 140, आसाममधील 126 आणि पुदुचेरीमधील 30 जागांवर मतदान होणार आहे. निवडणुका सुरळीत पार पडाव्यात यासाठी निवडणूक आयोगाने कडक सुरक्षा व्यवस्था, वेबकास्टिंग आणि लॉजिस्टिकल व्यवस्था केली आहे. आसाममधील लढत प्रामुख्याने दोन पक्षांमधील आहे, ज्यात मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखालील भाजपप्रणीत एनडीए सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. गौरव गोगोई यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस विरोधी पक्ष दशकभरानंतर पुन्हा सत्तेत परतण्याची आशा बाळगून आहे. राज्यात सुमारे 2.5 कोटी मतदार असून, त्यामध्ये 1.25 कोटींहून अधिक महिला, प्रथमच मतदान करणारे मतदार, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींचा समावेश आहे, जे 31,490 मतदान केंद्रांवर आपले मत देतील.
केरळमधील 140 जागांवर सलग तिसऱ्यांदा विजय आणि सत्तेत पुनरागमन करण्यासाठी डावे व काँग्रेसमध्ये लढत आहे. मुख्यमंत्री पिनारयी विजयन यांच्या नेतृत्वाखालील डावी लोकशाही आघाडी, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त लोकशाही आघाडीला आव्हान देत सलग तिसरा विजय मिळवण्याच्या प्रयत्नात आहे.
पुदुचेरीमध्ये एनडीए, काँग्रेस-डीएमके गट आणि अभिनेता विजयच्या नव्याने स्थापन झालेल्या 'तामिळगा वेत्री कळघम' यांच्यात बहुपक्षीय लढत होत आहे. पुदुचेरी, कराईकल, माहे आणि यानम येथील 1,099 मतदान केंद्रांवर सुमारे 9.5 लाख मतदार 294 उमेदवारांमधून आपली निवड करतील. तिन्ही राज्यांमध्ये आज होणाऱ्या मतदानाचे निकाल पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूच्या निकालांसोबत 4 मे रोजी जाहीर होतील.
तीन राज्यात कोण-कोणाविरुद्ध लढणार?
केरळ: राज्यातील 140 विधानसभा जागांवर एकूण 883 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. 2.6 कोटींहून अधिक मतदार त्यांचे भवितव्य ठरवतील. मुख्य लढत सीपीआय(एम)च्या नेतृत्वाखालील एलडीएफ, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफ आणि भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए यांच्यात आहे. एनडीएकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, एलडीएफकडून मुख्यमंत्री पिनारयी विजयन आणि काँग्रेसकडून राहुल गांधी यांनी अनेक निवडणूक सभांना संबोधित केले. एलडीएफ, किंवा डाव्या लोकशाही आघाडीकडे सध्या एकूण 99 आमदार आहेत या निवडणुका जिंकून सलग तिसऱ्यांदा सत्तेत येण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
आसाम: आसाममधील मुख्य लढत काँग्रेस आणि भाजप यांच्यात आहे. निवडणूक प्रचार संपेपर्यंत दोन्ही पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची फेरी सुरू होत्या. राज्यात एकूण 722 उमेदवार रिंगणात आहेत. राज्यातील 126 विधानसभा जागांवर पुढील पाच वर्षांसाठी आमदार कोण होणार, हे अडीच कोटींहून अधिक मतदार ठरवणार आहेत. हिमंता बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सलग तिसऱ्यांदा सत्तेत परतण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच वेळी, भाजपला रोखण्यासाठी काँग्रेसने सहा पक्षांसोबत आघाडी केली आहे. आसाममधील सर्व 31,490 मतदान केंद्रांवर वेबकास्टिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचबरोबर, 1,51,132 मतदान कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
पुदुचेरी: केरळ आणि आसामसह पुदुचेरीमधील सर्व 30 विधानसभा जागांसाठी गुरुवारी मतदान होत आहे. 9.44 लाख मतदारांपैकी अंदाजे 4.43 लाख पुरुष, 5 लाख महिला मतदार आहेत. एकूण 294 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. निवडणूक आयोगाने 1,099 मतदान केंद्रांवर 110 क्षेत्रीय अधिकारी तैनात केले आहेत. 209 केंद्रे संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत.
पोटनिवडणुका: आसाम, केरळ आणि पुदुचेरी व्यतिरिक्त, कर्नाटकातील दोन आणि नागालँड व त्रिपुरातील प्रत्येकी एका विधानसभा जागेवरील पोटनिवडणुकांसाठी आज मतदान होत आहे. माजी मंत्री रवी नाईक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या गोव्याच्या पोंडा विधानसभा जागेवर 9 एप्रिल रोजी मतदान होणार होते. तथापि, मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर येथील निवडणूक रद्द करण्यात आली आहे.
तामिळनाडूतील सर्व 234 जागांसाठी आणि पश्चिम बंगालमधील 152 जागांसाठी 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये, उर्वरित 142 जागांसाठी 29 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील बारामती व राहुरी पोटनिवडणुका 23 एप्रिल रोजी होणार आहेत. पाच राज्यांचे आणि पोटनिवडणुकांचे निकाल 4 मे रोजी एकाच वेळी जाहीर केले जातील.

