मुंबई. Bachchu kadu joins shiv sena: मागील अनेक दिवसांपासून जी चर्चा सुरू होती ती अखेर खरी ठरली आहे. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रहार संघटनेचे नेते माजी मंत्री बच्चू कडू यांनी प्रहार संघटना शिवसेनेत विलीन करत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत धनुष्यबाण हाती घेतलं आहे.
बच्चू कडू यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांना विधान परिषदेची संधी देऊ, अशी अट शिवसेनेने घातल्यानंतर बच्चू कडू यांनी प्रहारच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून शिवसेनेत सामील होण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे आणि मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यानंतर त्यांना शिवसेनेकडून विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेनेकडून दोन जण विधान परिषदेवर जाणार आहेत. त्यात बच्चू कडू एक आहेत. विधान परिषदेत विजयासाठी 28 मतांचा कोटा आवश्यक आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 57 आमदार आहेत.
यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले, एक कडवट कार्यकर्ता, सर्वसामान्यांसाठी झटणारा, दिव्यांगासाठी लढणारा आंदोलक नेता म्हणून बच्चू कडू यांची राज्यात ओळख आहे. बच्चू कडू यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे. जेव्हा जेव्हा आंदोलन मोर्चे निघाले तेव्हा त्यांची ताकद दिसून आली आहे. आज त्यांचे शिवसेनेत स्वागत करतो. बच्चू कडू मूळचे शिवसैनिकच आहेत. २५ वर्ष प्रहार संघटनेचे काम केले आणि त्यानंतर आज पुन्हा स्वगृही बच्चू कडू आलेत.शिवसेना त्यांंना नवीन नाही. ते मूळचे शिवसैनिक आहात. आज स्वगृही शिवसेनेत आलात. आपण आमदारकरीसाठी आलेला नाहीत हे स्पष्ट केलं. तुमची धेय्य, धोरणं,गरीबांना न्याय देण्याचा मुद्दा याला कुठेतरी सत्तेचं बळ लागतं, त्यामुळे हा निर्णय घेतला आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
पक्षप्रवेशावेळी बच्चू कडू म्हणाले यापुढे प्रहार संघटना सामाजिक संघटना म्हणून कार्यरत राहील आणि शिवसेनेच्या माध्यमातून शेतकरी, दिव्यांग यांच्या प्रश्नांसाठी काम केले जाईल. भविष्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात काम करू. फक्त आमदारकीसाठी नव्हे तर सामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्यासाठी आज शिवसेनेत प्रवेश करत आहे. आमचा झेंडा बदलला असला तरी अजेंडा तोच आहे, असा शब्द बच्चू कडू यांनी पक्षप्रवेशावेळी दिला.
पक्षप्रवेशाच्या आधी बच्चू कडू यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यांनी म्हटले की, गेल्या काही दिवसांपासून शिवसेना नेतृत्वासोबत विविध मुद्द्यांवर चर्चा सुरू होती. या चर्चांमध्ये शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग आणि वंचित घटकांच्या प्रश्नांवर सविस्तर विचारविनिमय झाला. आम्ही मांडलेल्या सर्व मागण्या शिवसेनेने मान्य केल्या आहेत. त्यामुळेच हा निर्णय घेतला. केवळ राजकीय फायद्यासाठी नव्हे तर सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. सत्ता ही जनतेच्या कामासाठी असते.
दरम्यान, बच्चू कडूंच्या या निर्णयामुळे राज्याच्या राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे शिवसेनेत विलिनीकरण होण्याचीही चर्चा सुरू असून, याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होऊ शकते.
शिवसेनेसाठीही हा मोठा राजकीय फायदा मानला जात आहे. ग्रामीण भागात आणि विशेषतः शेतकरी व दिव्यांगांच्या प्रश्नांवर काम करणारा नेता म्हणून बच्चू कडू यांची ओळख आहे. त्यामुळे त्यांच्या प्रवेशामुळे पक्षाची ताकद वाढण्याची शक्यता आहे.आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

