जेएनएन, मुंबई: अभिनेत्री जेनेलिया देशमुख हिच्या वाढदिवसानिमित्त अभिनेता आणि पती रितेश देशमुख याने सोशल मीडियावर एक भावूक आणि विनोदी पोस्ट शेअर करत तिला खास शुभेच्छा दिल्या आहेत. रितेशची ही पोस्ट चाहत्यांच्या पसंतीस उतरली असून त्यावर जेनेलियानेही दिलेल्या मजेशीर प्रतिक्रियेची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
रितेशने आपल्या पोस्टमध्ये जेनेलियासोबतच्या आयुष्यातील सुंदर आठवणींना उजाळा देत तिच्यावरील प्रेम व्यक्त केले. त्याने लिहिले, "आपण एकत्र अनुभवलेल्या, जपलेल्या आणि निर्माण केलेल्या आठवणींकडे मी पाहत होतो. तेव्हा माझ्या लक्षात आले की केवळ मीच वयस्कर होत चाललो आहे, पण तू मात्र जणू काळाच्या ओघात तशीच, अगदी पूर्वीसारखीच राहिलीस आहेस. अर्थात, तुला एक उत्तम पती लाभला आहे, हेच त्याचे खरे कारण असावे."
यानंतर रितेशने आपल्या कुटुंबासाठी जेनेलियाचे महत्त्व अधोरेखित करत लिहिले, "आमच्या कुटुंबाला एकसंध ठेवणाऱ्या त्या व्यक्तीला, एक 'सुपर मॉम', एक अप्रतिम मुलगी, एक प्रेमळ बहीण आणि माझ्या 'वेड्या बायकोला' वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे."
रितेशच्या या पोस्टवर जेनेलियानेही तितक्याच प्रेमळ आणि मिश्किल अंदाजात प्रतिक्रिया दिली. तिने कमेंटमध्ये लिहिले, "माझा नवरा जगात सर्वोत्तम आहे - कोणालाही विचारा! माझा नवरा असल्याबद्दल तुझे आभार."
रितेश आणि जेनेलिया हे बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि आदर्श जोडप्यांपैकी एक मानले जातात. दोघेही सोशल मीडियावर एकमेकांविषयीचे प्रेम व्यक्त करताना दिसतात. त्यांच्या पोस्टमधील विनोद, आपुलकी आणि कौटुंबिक नात्यांमुळे चाहते त्यांच्यावर कायमच प्रेमाचा वर्षाव करत असतात. जेनेलियाच्या वाढदिवसानिमित्त शेअर केलेल्या या पोस्टने पुन्हा एकदा या लोकप्रिय जोडीचे गोड नाते चाहत्यांसमोर आणले आहे.
हेही वाचा:Aamir Khan च्या तिसऱ्या लग्नाने वाढला वाद, लॉरेन्स बिश्नोई गँगच्या धमकीनंतर मुंबई पोलिसांनी उचलले मोठे पाऊल

