मुंबई: मीरा रोड येथे दोन सुरक्षा रक्षकांवर हल्ला करणाऱ्या संशयिताबाबत एक मोठा खुलासा झाला आहे. तपासात असे उघड झाले आहे की, संशयित मुंबईतील संवेदनशील भागांच्या नकाशांचा अभ्यास करत होता.
मीरा रोड येथील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमधील रक्षकांवर चाकूने हल्ला केल्यानंतर सुमारे एका तासाने, ३१ वर्षीय आरोपी झैब झुबेर अन्सारी याला सोमवारी अटक करण्यात आली. त्याने सुरक्षा रक्षकांना त्यांचा धर्म विचारला आणि त्यांना कलमा म्हणायला सांगितले, जे त्यांना जमले नाही, त्यानंतर अन्सारीने त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. अन्सारी 2000 ते 2020 पर्यंत आपल्या आई-वडिलांसोबत अमेरिकेत राहत होता आणि त्याचा वर्क परमिट संपल्यानंतर 2020 मध्ये तो भारतात परतला होता.
धार्मिक कट्टरतावादी सामग्रीने प्रभावित-
सूत्रांनुसार, आरोपी कट्टरतावादी व्हिडिओ पाहत असे आणि एकट्याने हल्ला करण्याच्या 'लोन वुल्फ' डावपेचांचेही प्रशिक्षण घेत होता. तो अमेरिकेत कट्टरतावादी बनला की भारतात परतल्यानंतर, याचा तपास यंत्रणा आता शोध घेत आहेत.
अन्सारी हा पूर्वी रसायनशास्त्राचा शिक्षक होता आणि एका कोचिंग सेंटरमध्ये शिकवत असे. त्यामुळे, तो स्फोटके किंवा रासायनिक शस्त्रे बनवण्याची योजना आखत होता का, याचाही तपास अधिकारी करत आहेत. सूत्रांच्या मते, रक्षकांवरील हल्ला हा योगायोग नसून, सुरक्षा एजन्सीजच्या प्रतिसादाच्या वेळेची चाचणी घेण्याचा एक प्रयत्न होता.
इसिसमध्ये सामील होण्याचा उद्देश -
तपासादरम्यान, आरोपीच्या घरातून 'लोन वुल्फ' हल्ले आणि इस्लामिक स्टेट या दहशतवादी गटाचा उल्लेख असलेली एक हस्तलिखित चिठ्ठी जप्त करण्यात आली. एक लॅपटॉप आणि कुराणच्या तीन प्रतीही जप्त करण्यात आल्या.
त्या चिठ्ठ्यांमध्ये त्याने आयसिसमध्ये सामील होण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि त्यावर 'जिहाद' व 'गाझा' यांसारखे शब्द लिहिलेले आढळले. त्याने या हल्ल्याचे वर्णन आपले पहिले पाऊल असे केले होते. 2020 मध्ये भारतात परतल्यानंतर, अन्सारी काही काळ मुंबईतील कुर्ला आणि नवी मुंबईतील वाशी येथे राहिला, आणि 2022 पासून तो मीरा रोडच्या नया नगर परिसरात एकटाच राहत आहे. त्याची अफगाण वंशाची पत्नी त्याला सोडून अमेरिकेत स्थायिक झाली होती.
स्वतःला कट्टरपंथी बनवले-
या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, हे प्रकरण 'सेल्फ रेडिकलाइजेशन' म्हणजे स्वत: कट्टरपंथी बनल्याचे दिसते. ते म्हणाले की, आरोपी ऑनलाइन साहित्य आणि पुस्तकांमुळे प्रभावित झाला आणि कट्टर विचारसरणीकडे आकर्षित झाला.
या तपासात दहशतवादविरोधी पथक आणि राष्ट्रीय तपास यंत्रणा यांनाही सहभागी करून घेण्यात येत आहे. या प्रकरणात आणखी कोण सामील असू शकते किंवा या विचारसरणीचा इतरांवर प्रभाव पडला आहे का, हे निश्चित करण्याचा प्रयत्नही सरकार करत आहे.
हे ही वाचा -US रिटर्न उच्चशिक्षित तरुणाचा दोन सुरक्षा रक्षकांवर चाकू हल्ला, मुंबईतील मीरा रोड परिसरात पहलगाम सारखी घटना

