Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Maharashtra Politics: महायुतीच्या तीन मतदारसंघांत बंडखोरी कायम; मनधरणीचे प्रयत्न सुरू

Maharashtra Politics: महायुतीच्या तीन मतदारसंघांत बंडखोरी कायम; मनधरणीचे प्रयत्न सुरू

Jagran Marathi 3 days ago

जेएनएन, मुंबई: आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीसमोर बंडखोरीचे आव्हान अद्याप कायम असल्याचे चित्र दिसत आहे. पाच प्रमुख मतदारसंघांपैकी तीन ठिकाणी बंडखोर उमेदवार अजूनही निवडणुकीच्या रिंगणात ठाम असून, त्यांची माघार घेण्यासाठी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांकडून प्रयत्न सुरू आहेत.

संभाजीनगर मतदारसंघात समीर सत्तार, नाशिकमध्ये भाजपचे गणेश गिते, तर रायगडमध्ये जुईली दळवी यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. त्यामुळे या तिन्ही मतदारसंघांमध्ये महायुतीच्या अधिकृत उमेदवारांसमोर अंतर्गत आव्हान निर्माण झाले आहे. पक्षांतर्गत नाराजी आणि स्थानिक पातळीवरील समीकरणांमुळे हे बंडखोर उमेदवार माघार घेण्यास तयार नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

महायुतीच्या नेत्यांकडून या बंडखोरांशी सातत्याने संवाद साधला जात असून, त्यांची नाराजी दूर करण्यासाठी मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. निवडणुकीत मतविभाजन टाळणे आणि अधिकृत उमेदवारांचा विजय सुनिश्चित करणे हे महायुतीसमोरचे प्रमुख आव्हान मानले जात आहे.

दरम्यान, पुणे मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते सुनील टिंगरे यांच्या उमेदवारीचा प्रश्न निकाली निघाल्याचे मानले जात आहे. पक्ष नेतृत्वाच्या हस्तक्षेपानंतर त्यांनी मवाळ भूमिका घेतल्याने तेथील बंडखोरीचा मुद्दा जवळपास शांत झाल्याचे चित्र आहे.

तर अमरावती मतदारसंघात शिवसेनेचे बंडखोर उमेदवार विप्लव बाजोरिया यांना मोठा धक्का बसला आहे. निवडणूक प्रक्रियेदरम्यान त्यांच्या उमेदवारी अर्जाची छाननी करण्यात आली असता अर्ज बाद करण्यात आल्याने ते निवडणुकीच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत.

यामुळे पाचपैकी दोन मतदारसंघांतील बंडखोरीचा प्रश्न निकाली निघाला असला तरी संभाजीनगर, नाशिक आणि रायगड या तीन मतदारसंघांतील बंडखोर महायुतीसाठी डोकेदुखी ठरत आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीपूर्वी या बंडखोरांची मनधरणी करण्यात महायुतीला कितपत यश येते, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात उकाडा कायम; मान्सूनची प्रतीक्षा, अनेक जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Jagran Marathi