जेएनएन, मुंबई: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटपाचा तिढा अखेर सुटला असून भाजपने आपल्या 11 उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केली आहे. या यादीत सर्वाधिक चर्चेचा विषय ठरले आहेत माजी मंत्री प्राजक्त तनपुरे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अवघ्या 24 तासांत त्यांना विधान परिषद निवडणुकीची उमेदवारी देण्यात आली आहे.
भाजपच्या 11 उमेदवारांची यादी
भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारांमध्ये खालील नावांचा समावेश आहे:
* अरुण लखानी - वर्धा
* अविनाश ब्राम्हणकर - भंडारा-गोंदिया
* प्रवीण पाटील - अमरावती
* धैर्यशील कदम - सांगली-सातारा
* राजेंद्र राऊत - सोलापूर
* प्राजक्त तनपुरे - अहिल्यानगर
* सुहास शिरसाट - संभाजीनगर
* अमर राजूरकर - नांदेड
* बसवराज पाटील - धाराशीव-लातूर-बीड
* नंदकिशोर महाजन - जळगाव
* डॉ. राजीव पोतदार - नागपूर (पोटनिवडणूक)
प्राजक्त तनपुरेंची उमेदवारी चर्चेत
राजकीय वर्तुळात सर्वाधिक चर्चा प्राजक्त तनपुरे यांच्या उमेदवारीची आहे. 30 मे रोजी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. मुंबईतील भाजप कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात राज्याचे वरिष्ठ नेते रवींद्र चव्हाण यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. प्रवेशानंतर केवळ एका दिवसातच भाजपने त्यांना अहिल्यानगर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
महायुतीत जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित
विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीतील जागावाटपावर अनेक दिवस चर्चा सुरू होती. अखेर प्रदेश आणि दिल्लीतील वरिष्ठ नेतृत्वाच्या बैठकीनंतर अंतिम फॉर्म्युला ठरला. त्यानुसार 17 जागांपैकी
* भाजप - 11 जागा
* शिवसेना - 4 जागा
* राष्ट्रवादी काँग्रेस - 2 जागा
अशी विभागणी करण्यात आली आहे.
शिवसेनेला माघार घ्यावी लागली
शिवसेना सुरुवातीला 7 जागांवर निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर ठाम होती. मागील निवडणुकीत मिळालेल्या 5 जागा कायम ठेवण्याबरोबरच दोन अतिरिक्त जागांची मागणी पक्षाने केली होती. मात्र, अंतिम चर्चेनंतर शिवसेनेला 4 जागांवर समाधान मानावे लागले.
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसने सुरुवातीच्या अपेक्षेपेक्षा एक अतिरिक्त जागा मिळवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
निवडणुकीकडे राज्याचे लक्ष
महायुतीतील जागावाटप निश्चित झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष उमेदवारांच्या प्रचारावर आणि स्थानिक स्वराज्य संस्थांतील मतदारांच्या समीकरणांवर लागले आहे. प्राजक्त तनपुरे यांची भाजपमधील एंट्री आणि तत्काळ मिळालेली उमेदवारी हा या निवडणुकीतील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला आहे. आगामी दिवसांत या उमेदवारीचा अहिल्यानगरसह राज्यातील राजकीय समीकरणांवर काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

