जेएनएन, बुलढाणा: राज्यात सध्या पेट्रोल आणि डिझेल टंचाईची गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून त्याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात खरीप हंगामाच्या तोंडावर मशागतीची कामे सुरू असताना डिझेल मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
अनेक ठिकाणी ट्रॅक्टर घेऊन शेतकरी रात्रभर पेट्रोल पंपांवर थांबत असल्याची चित्रे समोर आली आहेत. 
वाशिम, बुलढाणा, परभणी, जालना, नांदेड, हिंगोली आणि संभाजीनगरसह अनेक जिल्ह्यांत पेट्रोल पंपांवर डिझेलसाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. काही ठिकाणी सकाळी इंधन उपलब्ध झाले तरी अवघ्या काही तासांत साठा संपत असल्याने नागरिक आणि शेतकऱ्यांची धावपळ उडाली आहे. 
ट्रॅक्टरवरच जागून काढली रात्र
खरीपपूर्व मशागतीसाठी ट्रॅक्टर, रोटाव्हेटर आणि इतर यंत्रांचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असतो. मात्र डिझेलच मिळत नसल्याने शेतकऱ्यांची कामे ठप्प झाली आहेत. अनेक गावांमध्ये शेतकरी रात्रीपासूनच ट्रॅक्टर घेऊन पेट्रोल पंपांवर पोहोचत आहेत. काहींनी तर नंबर लागू नये म्हणून ट्रॅक्टरवरच झोप घेत रात्र काढल्याचे सांगितले.
"दोन दिवसांपासून मशागत बंद आहे. पाऊस येण्याआधी शेत तयार करायचं आहे, पण डिझेल नसल्याने ट्रॅक्टर उभे आहेत," अशी प्रतिक्रिया अनेक शेतकऱ्यांनी दिली आहे.
काही ठिकाणी सातबारा दाखवल्यावरच डिझेल
मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की, पेट्रोल पंप चालकांकडून शेतकऱ्यांना डिझेल देण्यासाठी सातबारा, ट्रॅक्टरचे आरसी बुक किंवा अॅग्रीस्टॅक क्रमांक मागितला जात आहे. परभणी आणि जालना जिल्ह्यात प्रशासनाने कॅनमध्ये डिझेल देताना कागदपत्रांची अट घातल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
सरकारचा दावा - "राज्यात इंधनाचा तुटवडा नाही"
दरम्यान, राज्य सरकारने इंधन तुटवडा नसल्याचा दावा केला आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि साठेबाजी टाळावी, असे आवाहन केले आहे. पश्चिम आशियातील तणाव आणि पुरवठा साखळीतील अडचणींमुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर इंधन खरेदी केल्याने तात्पुरता दबाव निर्माण झाल्याचे सरकारचे म्हणणे आहे.
शेतकऱ्यांचे प्रश्न कायम
सरकारकडून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले जात असले तरी ग्रामीण भागातील वास्तव वेगळेच दिसत आहे. अनेक पंप कोरडे पडत असून डिझेलअभावी मशागतीची कामे रखडली आहेत. पावसाळा जवळ आल्याने वेळेत पेरणी न झाल्यास उत्पादनावर परिणाम होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.
हेही वाचा: पश्चिम उपनगरांना लवकरच पाणी दिलासा; जुन्या जलवाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी पालिकेचा 30 कोटींचा आराखडा

