Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मनोज जरांगेंच्या आंदोलनानंतर ओबीसी समाजही आक्रमक; पुणे-सोलापूर महामार्गावर तणाव, अनेक ठिकाणी जलसमाधी आंदोलन

मनोज जरांगेंच्या आंदोलनानंतर ओबीसी समाजही आक्रमक; पुणे-सोलापूर महामार्गावर तणाव, अनेक ठिकाणी जलसमाधी आंदोलन

Jagran Marathi 1 week ago

जालना/पुणे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आंदोलनाची तीव्रता वाढताना दिसत आहे. जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांनी जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे, तर दुसरीकडे ओबीसी समाजाच्या मोर्चाला पोलिसांनी अडवल्याने पुणे-सोलापूर महामार्गावर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

खडकीत मराठा आंदोलकांचे जलसमाधी आंदोलन

मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. मात्र, अद्याप सरकारकडून त्यांच्या मागण्यांबाबत ठोस निर्णय झालेला नसल्याने मराठा समाजातील आंदोलकांमध्ये नाराजी आहे. याच पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील खडकी गावातील तळ्यात मराठा आंदोलकांनी जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे.

सरकारने मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची तातडीने दखल घ्यावी आणि मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे. सरकारने मागण्यांवर निर्णय घेईपर्यंत पाण्याबाहेर न येण्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे.त्यामुळे खडकी परिसरात प्रशासन आणि पोलिसांकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. आंदोलकांच्या भूमिकेमुळे आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पुणे-सोलापूर महामार्गावर ओबीसी मोर्चा अडवला

दरम्यान, ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी काढण्यात आलेला मोर्चा पुणे-सोलापूर महामार्गावरील पाटस टोलनाक्यावर पुणे ग्रामीण पोलिसांनी अडवला आहे. मोर्चाला परवानगी नसल्याचे कारण पोलिसांकडून देण्यात आले आहे.

मोर्चा अडवल्यामुळे आंदोलक कार्यकर्ते आक्रमक झाले असून महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

लक्ष्मण हाके आक्रमक

मोर्चात सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते येत आहेत. मात्र, पोलिसांनी पाटस टोलनाक्यावरच मोर्चा रोखल्याने परिस्थिती चिघळली आहे. मोर्चातील सर्व कार्यकर्ते जमा झाल्याशिवाय मोर्चा पुढे नेणार नाही, अशी भूमिका ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी घेतली आहे.पोलिस आणि आंदोलकांमध्ये यावेळी शाब्दिक वादावादी झाल्याची माहिती आहे. महामार्गावर वाहतूक विस्कळीत झाल्याने पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

राज्यात आंदोलनांची तीव्रता वाढली

एकीकडे जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांनी जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे, तर दुसरीकडे ओबीसी समाजाचा मोर्चा पोलिसांनी रोखल्याने पुणे-सोलापूर महामार्गावर तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यातील वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

सरकारने दोन्ही समाजांच्या मागण्यांवर काय भूमिका घेतली आणि आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी पुढील कोणती पावले उचलली जातात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा -Anna Hazare Hospitalised: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती बिघडली; मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमधील ICU मध्ये दाखल

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Jagran Marathi