Dailyhunt
Monsoon 2026: एल-निनोच्या छायेतही मान्सून वेळेवर; 'या' दिवशी धडकणार महाराष्ट्रात!

Monsoon 2026: एल-निनोच्या छायेतही मान्सून वेळेवर; 'या' दिवशी धडकणार महाराष्ट्रात!

Jagran Marathi 1 week ago

जेएनएन, मुंबई: एकीकडे एल निनो चा प्रभाव वाढत असल्याने यंदाचा पावसाळा कमकुवत राहण्याची भीती व्यक्त केली जात असतानाच, दुसरीकडे समाधानकारक बातमी समोर आली आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथील माजी कृषी हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी यंदा मान्सून वेळेवर आणि काही भागांत अपेक्षेपेक्षा लवकर दाखल होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

साधारण तीन दिवस आधी पोहोचण्याची शक्यता

त्यांच्या मते, मान्सूनची सुरुवात नेहमीप्रमाणे अंदमान परिसरात होईल, मात्र यंदा तो साधारण तीन दिवस आधी पोहोचण्याची शक्यता आहे. त्यानंतर केरळम् राज्यात मान्सून दोन ते तीन दिवस आधी दाखल होऊ शकतो.

2 ते 3 जूनदरम्यान महाराष्ट्रात पावसाळ्याची सुरुवात

महत्त्वाचे म्हणजे, गोवा आणि महाराष्ट्र येथेही मान्सूनचे आगमन सरासरी तारखेपेक्षा सुमारे दोन दिवस आधी होण्याचा अंदाज आहे. 2 ते 3 जूनदरम्यान महाराष्ट्रात पावसाळ्याची सुरुवात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

जागतिक पातळीवर एल निनोमुळे पर्जन्यमानावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो, असे मानले जाते. मात्र यंदा हिंद महासागर परिसरातील वातावरणीय स्थिती अनुकूल असल्याने मान्सूनला मदत होणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

यामुळे, शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला पावसाळा यंदा समाधानकारक राहील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर ही बातमी शेतकऱ्यांसाठी दिलासादायक मानली जात आहे.

दरम्यान, हवामान खात्याच्या अधिकृत अंदाजाकडे सर्वांचे लक्ष लागले असून, येत्या काही दिवसांत मान्सूनच्या प्रगतीबाबत अधिक स्पष्ट चित्र समोर येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - BJP MP Car Accident: ठाण्यात भाजप खासदार हेमंत सावरा यांच्या कारचा भीषण अपघात

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Jagran Marathi