Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Mumbai Metro: मुंबई मेट्रोचा विस्तार भाईंदर-विरारपर्यंत; 17,725 कोटींच्या मेट्रो-13ला हिरवा कंदील, वसई खाडीवर बनणार 4.92 किमीचा भव्य पूल

Mumbai Metro: मुंबई मेट्रोचा विस्तार भाईंदर-विरारपर्यंत; 17,725 कोटींच्या मेट्रो-13ला हिरवा कंदील, वसई खाडीवर बनणार 4.92 किमीचा भव्य पूल

Jagran Marathi 1 month ago

मुंबई. मुंबई महानगर प्रदेशातील वाढती लोकसंख्या आणि दिवसेंदिवस वाढणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन मेट्रोच्या जाळ्याचा विस्तार वेगाने करण्यात येत आहे. आता भाईंदर ते वसई-विरार परिसराला जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी मेट्रो मार्गिका क्रमांक 13 ला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.

तब्बल 17,724.99 कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पामुळे भाईंदर, वसई, नायगाव, नालासोपारा आणि विरार या महत्त्वाच्या भागांना थेट मेट्रो कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.

या प्रस्तावित मेट्रो मार्गाची लांबी 25.03 किलोमीटर असून मार्गावर 16 स्थानके उभारण्यात येणार आहेत. त्यापैकी सुमारे 21.78 किलोमीटर मार्ग उन्नत (Elevated) तर 3.25 किलोमीटर मार्ग भूमिगत (Underground) असणार आहे. या प्रकल्पामुळे भाईंदर-वसई-विरार पट्ट्यातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, सध्याच्या रस्ते वाहतुकीवरील ताणही कमी होणार आहे.

वसई खाडीवर 4.92 किमीचा पूल

मेट्रो-13चे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे वसई खाडीवर उभारला जाणारा 4.92 किलोमीटर लांबीचा एकात्मिक पूल असणार आहे. या पुलावर रस्ता आणि मेट्रो अशा दोन्ही वाहतुकीची सुविधा असणार आहे. पुलामुळे भाईंदर आणि वसईदरम्यान सध्या असलेला मोठा वाहतूक वळसा कमी होणार असून प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचणार आहे.

या पुलामुळे भाईंदर-वसईदरम्यानचा रस्ते प्रवास सुमारे 40 मिनिटांवरून 10 मिनिटांपर्यंत कमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पुलाच्या माध्यमातून पानजू बेटाशीही थेट संपर्क निर्माण होणार आहे.

अशी असेल मेट्रो-13ची मार्गिका

मेट्रो-13ची सुरुवात भाईंदर येथून होऊन ती पुढे वसई-विरार परिसरात जाणार आहे. या मार्गावर प्रमुख भागांना जोडत मेट्रो डोंगरपाडा, विरारपर्यंत पोहोचणार आहे.

प्रस्तावित मार्गावरील स्थानकांमध्ये सुभाषचंद्र मैदान, नायगाव, छत्रपती शिवाजी महाराज चौक, जुचंद्र, राजवली, गोलानी नाका, वसई, व्हीव्हीसीएमसी फायर स्टेशन, आचोळे गाव, नालासोपारा पूर्व, नालासोपारा पश्चिम, मोरया नगर, यशवंत नगर, विरार, विवा कॉलेज आणि डोंगरपाडा यांचा समावेश आहे.

मार्गातील दाट लोकवस्ती आणि तांत्रिक गरजा लक्षात घेऊन काही भाग भूमिगत ठेवण्यात येणार आहेत. एकूण 16 स्थानकांपैकी 13 स्थानके उन्नत आणि 3 स्थानके भूमिगत असणार आहे.

रेल्वे आणि मेट्रोच्या इतर मार्गांशी कनेक्टिव्हिटी

मेट्रो-13 केवळ भाईंदर-विरारला जोडणारी स्वतंत्र मार्गिका न राहता मुंबई महानगरातील विद्यमान वाहतूक नेटवर्कशी जोडली जाणार आहे. या मार्गाची मेट्रो-9शी जोडणी होणार असून, त्यामुळे पुढे दहिसर, अंधेरी पूर्व आणि गुंदवलीच्या दिशेने प्रवास करणे अधिक सोपे होणार आहे.

याशिवाय नायगाव, नालासोपारा आणि विरार या उपनगरी रेल्वे स्थानकांशी मेट्रोची इंटरचेंज कनेक्टिव्हिटी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना मेट्रोचा पर्यायी आणि जलद पर्याय मार्ग उपलब्ध होणार आहे.

2031 पर्यंत दररोजसाडेचार लाख प्रवाशांचा अंदाज

वसई-विरार आणि भाईंदर परिसरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाले आहे. त्यामुळे रस्ते आणि लोकल रेल्वेवर प्रवाशांचा मोठा ताण आहे. मेट्रो-13मुळे या भागातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत होण्याची अपेक्षा आहे.

या मार्गावर 2031 पर्यंत दररोज सुमारे 4.49 लाख प्रवासी प्रवास करतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. रस्ते प्रवासाच्या तुलनेत प्रवासाचा वेळ सुमारे 50 टक्क्यांनी कमी होण्याची अपेक्षा आहे.

17,725 कोटींचा प्रकल्प

मेट्रो-13साठी राज्य सरकारने 17,724.99 कोटी रुपयांचा खर्च मंजूर केला आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात MMRDA या प्रकल्पाची अंमलबजावणी करणार आहे.

या प्रकल्पाचा कालावधी सुमारे पाच वर्षांचा ठेवण्यात आला असून, प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर भाईंदर-वसई-विरार पट्ट्यातील वाहतुकीचे चित्र मोठ्या प्रमाणावर बदलण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा -Price Hike: मुंबईकरांना चौफेर फटका! रिक्षा-टॅक्सी प्रवास महाग; दूधाच्या दरात उसळी, CNG-PNG दरवाढीचाही भडका

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Jagran Marathi