जेएनएन, मुंबई: महाराष्ट्र दिन (Maharashtra Day) आणि लागून आलेल्या शनिवार-रविवारच्या लाँग वीकेंडमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे वर पुन्हा एकदा प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. या कोंडीचा फटका सर्वसामान्य वाहनचालकांसह राजकीय नेत्यांनाही बसत असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनाही याचा त्रास सहन करावा लागला.
लांबलचक रांगांमुळे वाहतुकीचा वेग मंदावला
सुप्रिया सुळे या तब्बल दोन तासांहून अधिक काळ एक्स्प्रेसवेवरील वाहतूक कोंडीत अडकून पडल्या होत्या. त्यांनी स्वतः सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत परिस्थितीची माहिती दिली. वाढत्या गर्दीमुळे आणि वाहनांच्या लांबलचक रांगांमुळे वाहतुकीचा वेग मंदावल्याचे त्यांनी सांगितले.
झेंडावंदनासाठी पोहोचू शकल्या नाही वेळेत
या वाहतूक कोंडीचा परिणाम त्यांच्या अधिकृत कार्यक्रमावरही झाला. महाराष्ट्र दिनानिमित्त पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात होणाऱ्या झेंडावंदनासाठी त्या वेळेत पोहोचू शकल्या नाहीत. परिणामी, हा कार्यक्रम माजी खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते पार पडला.
दरम्यान, ही पहिलीच घटना नाही. दोन दिवसांपूर्वी मानखुर्द परिसरात झालेल्या मोठ्या वाहतूक कोंडीत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी या तब्बल पाच तास अडकल्या होत्या. त्यामुळे मुंबई आणि परिसरातील वाहतूक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
लाँग वीकेंड, पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात निघालेली वाहनं आणि काही ठिकाणी सुरू असलेली दुरुस्तीची कामं यामुळे एक्स्प्रेसवेवर ताण वाढल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाकडून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू असले तरी वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
हेही वाचा - Monsoon 2026: एल-निनोच्या छायेतही मान्सून वेळेवर; 'या' दिवशी धडकणार महाराष्ट्रात!

